सांगली : जिल्ह्यातील सद्गुरू श्री श्री शुगर, क्रांती, दत्त इंडिया आणि हुतात्मा या चार साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे १६० कोटी रुपये थकीत आहेत. उर्वरित दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले मिळाली नाहीत, ते शेतकरी बँकाकडे फेऱ्या मारत आहेत.जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी २०२२-२३ वर्षाचा गळीत हंगाम घेतला होता. यापैकी सर्वच कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप संपवून हंगाम बंद केले आहेत. राजारामबापू पाटील साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी आणि जत डफळे, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर आणि केन ॲग्रो या दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० टक्के एफआरपी जमा केली आहे. श्रीपती शुगर कारखान्याने पहिलाच गळीत हंगाम घेतला असून केवळ ५६ हजार ८३५ टन उसाचे गाळप केले. तसेच केन ॲग्रो शुगरनेही शेवटच्या टप्प्यातच गळीत हंगाम सुरू केला. परंतु, या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे जमा केले आहेत. सद्गुरू श्री श्री शुगरने ३४ कोटी २८ लाख, क्रांती कारखाना ५५ कोटी ९४ लाख, दत्त इंडिया २४ कोटी आणि हुतात्मा कारखान्याकडे ३३ कोटी ८० लाख रूपये असे एकूण १६० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत. या कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखानेराजारामबापू पाटील चारही युनिट, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर, केन ॲग्रो आदी दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या उसाची १०० टक्के एफआरपीनुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाकडून दिलासा मिळाला आहे. पण, एफआरपीच्या वरच्या रकमेचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नियमाने १४ दिवसांत एफआरपीनुसार पैसे मिळाले पाहिजेत. याबद्दल सर्व साखर कारखान्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. यातूनही काही कारखान्यांनी एफआरपीनुसार १०० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.