मिरज : एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून मिरजेत दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीत दहाजण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांच्या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुफिद मुनीर गोदड व जावेद इस्तगीर जमादार या दोघांनी परस्पर विरोधात फिर्याद दिली आहे.
मुफिद गोदड याने यासिन बाबू जमादार, मोहसीन जमादार, जावेद जमादार, राजू कवठेकर, अफताक कवठेकर, अफसार कवठेकर, जैद जमादार, बाबू जमादार, मुमताज जमादार, नुरहान कवठेकर, सोहेल गोदड यांच्याविरुद्ध व जावेद जमादार याने इरशाद गोदड, फारूक गोदड, शाहीद गोदड, महंमद मुजावर, मुफिक गोदड, अल्फाज गोदड, मुनीर गोदड, अन्वर गोदड, अमीर गोदड (सर्व रा. गोदड मळा, टाकळी रस्ता, मिरज) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
जावेद जमादार याचा आतेभाऊ सोहेल यास फारूक याने फोन करून बोलावून “तुझ्या घरातील मुले आमच्या मुलांकडे का रागाने बघतात, अशी विचारणा केल्याने सोहेल याने “आमची मुले तुमच्या मुलांकडे बघत नाहीत, तुमचीच मुले आमच्या मुलांकडे बघतात,” असे सांगितले. यावेळी सोहेल यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुनीर याने जावेद याच्या डोक्यात मारून जखमी केले. भांडण सोेडविण्यासाठी आलेल्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार जावेद जमादार याने केली आहे.
जुना वाद मिटविण्यासठी सोहेल यास फारूक गोदड याने फोन करून बोलवून घेतले. यावेळी वाद मिटवूया असे सांगत असताना सोहेल याने “तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला वाद वाढवायचाच आहे,” असे म्हणत फारूक यास ढकलून देत मारहाण केली. साहेल याने मुफिद याच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले. त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे मुफिद गोदड याने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.