सांगली : राज्यात अखेर ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन झाले आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रिक्षा व टॅक्सी चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. त्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू होती. अखेर शासनाने १६ मार्च २०२४ रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब’ नावाने मंडळ स्थापन करण्यात आले आहे. कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांकडे परवाना व बॅज असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडे ८ हजार १९२ रिक्षांची नोंद आहे. तसेच टॅक्सींची संख्या २८१० आहे. त्यामुळे जवळपास दहा हजारहून अधिक जणांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो.
कल्याणकारी मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागेल.नोंदणी करणे आवश्यकऑटो रिक्षा परवाना धारक, टॅक्सी चालक यांची नोंदणी आरटीओ कार्यालयामार्फत केली जाईल. नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र दिले जाईल. मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी परवाना, बॅज असणे बंधनकारक राहील. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील चार सदस्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळेल.
पाचशे रुपये नोंदणी शुल्क
योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क पाचशे रूपये असेल. त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क तीनशे रूपये राहणार आहे.विविध योजनांचा लाभजीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान आदी योजनांचा लाभ मिळू शकेल.
जिल्हास्तरीय समिती स्थापन होणारकल्याणकारी मंडळाची जिल्हा व राज्यस्तरीय समिती असेल. समित्यांची रचना शासन निर्णयानुसार असेल. मुख्य कार्यालय मुंबईत असेल. तसेच जिल्ह्यात देखील समितीचे कार्यालय कार्यरत राहील.