सांगली : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील १० गावांना पिवळे, तर ६८९ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. तपासणीमध्ये दोन तीव्र जोखीम स्रोतांची संख्या असून मध्यम जोखीमचे २५० पाण्याचे स्रोत सापडल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामपंचायतींना महिन्याभरात उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेन दिल्या आहेत.
जिल्ह्यातून चार हजार २५६ पाणीस्रोत आहेत. यामध्ये नळयोजनांच्या ६६९, विहिरींच्या २४२ आणि हातपंप व विंधन विहिरींच्या तीन हजार ३४५ पाणी स्रोतांचा समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतांचे वर्षातून दोन वेळा सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात येते. दि. १ ते ३० एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करलहट्टी, बसापाचीवाडी, आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी, चिंचाळे, खानापूर तालुक्यातील तांदळगाव, मिरज तालुक्यातील कदमवाडी आदी १० ग्रामपंचायतींना पिवळे, तर ६८९ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आाले. पाणीपुरवठा स्रोतातील पाणी नमुन्यांची कारणे शोधून संबंधित ग्रामपंचायतींना महिन्याभरात उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने दिल्या आहेत.
पाण्यासाठी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना, विहीर, कूपनलिका, हातपंप हे स्रोत आहेत. सर्वच स्रोत पिण्यास योग्य असतीलच असे नाही. बºयाचदा अनेक पाणी स्रोतात काही घटकांची कमतरता आढळून येते, तर काही घटक जास्त प्रमाणात असतात. शरीरावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाणी नमुन्यांचे सर्वेक्षण करुन तपासणी करण्यात येते. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करुन हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही हे कळते. पाण्यात काही घटकांची कमतरता असल्यास किंवा काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यात येतात. पावसाळा तोंडावर आला असून पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अनेकदा कूपनलिकांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाणी नमुन्याची तपासणी करण्याकडे लक्ष दिले जात नाही. नागरिकांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे. शरीरात जवळपास ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी सांगितले.
असे दिले जाते : कार्डपाणी स्रोताच्या स्वच्छता सर्वेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. सौम्य जोखीमसाठी हिरवे, मध्यमसाठी पिवळे व तीव्र जोखीमसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते. शून्य ते २९ गुणांपर्यंत हिरवे कार्ड, ३० ते ६९ गुणांपर्यंत पिवळे व ७० पेक्षा जास्त गुणांवर लाल कार्ड मिळते. जिल्ह्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणीस्रोत पिण्यास योग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या स्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यांच्या स्वाक्षरीने होते कार्डचे वाटपसौम्य जोखीमचे हिरवे कार्ड वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीने देण्यात येते, तर पिवळे कार्ड गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिले जाते. लाल कार्ड हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.