डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील पाणी योजनेचे काम आज (रविवारी) दुसऱ्या दिवशीही बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) तलावातून पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. कवठेमहांकाळ तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी बसाप्पाचीवाडी येथील काम अडवणाऱ्या ग्रामस्थांना कडक समज दिल्यामुळे आज तणावपूर्ण शांततेत काम करण्यात आले. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने बसाप्पाचीवाडी तलाव परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप निर्माण झाले.बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांकडून डफळापूर पेयजल योजना होऊ नये म्हणून वारंवार अडवणूक होत असल्या कारणाने डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी पोलीस बंदोबस्तात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलीस बंदोबस्तासाठी भरण्यात आले. शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यात आले. दिवसभर तणावपूर्ण शांततेत काम होत असताना बसाप्पाचीवाडी ग्रामस्थांनी सायंकाळी ४ वाजता काम बंद पाडले होते. कवठेमहांकाळ तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासमवेत बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थ व पेयजल योजना समितीची बैठक शनिवारी सायंकाळी पार पडली. बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांना ताकीद देण्यात आली व कारवाईचा बडगा उगारला.रविवारी सायंकाळपर्यंत सात जेसीबीच्या सहाय्याने युध्दपातळीवर काम करण्यात आले. आज अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत चर खोदून पाईपलाईन करण्यात आली. पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे कामाच्या ठिकाणी विरोध करणारे ग्रामस्थ फिरकले नाहीत.काम गतीने होत असल्यामुळे डफळापूरमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्या (सोमवारी) पोलीस बंदोबस्तात काम करण्यात येणार आहे. पेयजलचे अध्यक्ष सुनील चव्हाण, मन्सूर खतीब, सरपंच राजश्री शिंदे, उपसरपंच तानाजी चव्हाण, शंकर गायकवाड, अभिजित चव्हाण, पोपट पुकळे, मुरलीधर शिंगे, मीनाश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली. (वार्ताहर)
बसाप्पाचीवाडी तलाव परिसरात तणाव कायम
By admin | Published: January 05, 2015 12:01 AM