सांगली : भूलथापा मारून कोल्हापूरकरांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ठकसेन प्रकाश पाटीलने सांगली जिल्ह्यातही फसवणुकीचे जाळे टाकल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. सोलापूरला उपविभागीय अधिकारी असल्याची बतावणी करून त्याने ओझर्डे (ता. वाळवा) येथील सचिन शामराव पाटील (वय ४०) यांना नोकरीच्या आमिषाने दोन लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकाश पाटील याने विविध वृत्तपत्रात निधन वार्ता या मथळ्याखाली आलेल्या बातम्यांचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांना गंडा घातला. महिलेच्या प्रसंगावधानतेमुळे तो इचलकरंजी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तो सांगलीत यशवंतनगरनजीकच्या वसंतनगर येथे राहतो. १६ आॅगस्टला त्याला इचलकरंजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीत मंगळवारी त्याच्याविरुद्ध पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.ओझर्डेतील सचिन पाटील यांचा भाऊ संतोष याचे ४ मे २०१४ रोजी निधन झाले. २० मे रोजी त्यांच्या घरी पोस्टाने पत्र आले. त्यावर ‘रमेश एन. वाडकर, उपविभागीय अधिकारी, सोलापूर युनिट’ असे पत्र पाठविणाऱ्याचे नाव होते. या पत्रात संतोषबाबत विचारणा केली होती. त्यावर वाडकर यांचा मोबाईल क्रमांकही होता. त्यामुळे सचिन पाटील यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधून, संतोषचे निधन झाल्याचे सांगितले. यावर त्याने आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने सचिन यांच्या शिक्षणाची चौकशी करून शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तीन लाखाची मागणी केली. सचिन यांनी तेवढे पैसे नसल्याचे सांगितले. यावर त्याने सुरुवातीला दोन लाख रुपये द्या; उर्वरित एक लाख नोकरी लागल्यानंतर द्या, असे सांगितले.प्रसारमाध्यमांमुळे समजलेसचिन पाटील यांंच्याकडे पैसे दिल्याचा एकही पुरावा नव्हता. तसेच त्याचे छायाचित्र किंवा तो कोठे राहतो, याचीही माहिती नव्हती. मुळातच पाटीलने बनावट नाव सांगितले होते. पंधरवड्यापूर्वी तो सापडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून त्याच्या छायाचित्रासह प्रसिद्ध होताच, सचिन यांनी त्याला ओळखले. मंगळवारी त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.तो ‘पीएसआय’ आहे...प्रकाश पाटील हॉटेलात पैसे घेण्यासाठी अलिशान मोटारीतून (क्र. एमएच १२ व्ही १००७) आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. सचिन यांनी, हे कोण आहेत, अशी चौकशी केली. त्यावेळी पाटील याने ते ‘पीएसआय’ (पोलीस उपनिरीक्षक) आहेत, असे सांगितले होते.सांगलीत घेतले पैसेठकसेन पाटील याने सचिन यांना पैसे देण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१४ रोजी सांगलीत बोलावून घेतले. बालाजी चौकातील हॉटेल न्यू कॅफे रॉयलमध्ये त्याने सचिन यांच्याकडून प्रथम एक लाख रुपये घेतले. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी पुन्हा याच हॉटेलमध्ये आणखी एक लाख रुपये घेतले. त्याने सचिन यांना तलाठी पदावर नोकरी लागल्याचे बनावट नियुक्तीपत्रही दिले. त्यानंतर ७ डिसेंबर २०१४ रोजी त्याने सचिन यांच्याशी संपर्क साधून, राधानगरी येथे तलाठी पदावर नियुक्ती झाल्याचे सांगून, कधी हजर व्हायचे, हे दोन दिवसात सांगतो, असे सांगितले. सचिन यांनी त्याच्याशी संपर्क साधला,पण मोबाईल बंद होता. सोलापूरला जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली. परंतु रमेश एन. वाडकर या नावाचा कोणीही अधिकारी नसल्याचे समजले.
ठकसेन प्रकाश पाटीलचा सांगलीतही गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:57 PM