..म्हणूनच चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत ठेवले, सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

By अविनाश कोळी | Published: June 11, 2024 04:51 PM2024-06-11T16:51:10+5:302024-06-11T16:52:45+5:30

'आम्ही सध्या हात जोडून विनंती करीत आहोत. आम्हाला हात सोडायला भाग पाडू नये'

..That why work on Chintamaninagar railway flyover was delayed, protests by BJP workers in Sangli | ..म्हणूनच चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत ठेवले, सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

..म्हणूनच चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत ठेवले, सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सांगलीतीलकाँग्रेस नेत्याच्या नातलगाकडे आहे. रेंगाळलेल्या उड्डाणपुलामुळे स्थानिक भाजप आमदारावर रोष यावा म्हणूनच हे काम रेंगाळत ठेवण्याचे षडयंत्र केले गेले, अशी टीका मंगळवारी भाजपचे सरचिटणीस सत्यजित पाटील, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी व अल्पसंख्यांक मोर्चाचे सरचिटणीस आश्रफ वांकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी रेंगाळलेल्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यवंशी म्हणाले की, उड्डाणपुलाचे काम यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, यामागे राजकारण शिजत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली. पुलाचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे ते ठेकेदार काँग्रेस नेत्याचे नातेवाईक आहेत. काँग्रेस नेत्याच्या सुचनेप्रमाणेच ठेकेदाराकडून काम रेंगाळत ठेवण्यात आल्याचा आमचा संशय आहे. या गोष्टीतून जनतेचा रोष भाजप आमदारांवर यावा, यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. मुदतीत हे काम पूर्ण करावे, अन्यथा आम्ही ठेकेदाराविरुद्ध आंदोलन सुरु करु. याशिवाय संबंधित नेत्याचे नावही आम्ही जाहीर करु. आम्ही सध्या हात जोडून विनंती करीत आहोत. आम्हाला हात सोडायला भाग पाडू नये, असा इशारा त्यांनी दिला.

सत्यजित पाटील म्हणाले की, सहा महिन्यात जे काम अपेक्षित होते ते काम वर्ष झाले तरी अपूर्ण आहे. आणखी सहा महिने तरी हे काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. सांगलीसह विट्यापर्यंतच्या गावातील सर्व नागरिकांचे या पुलाअभावी हाल होत आहेत. पावसाळ्यात आणखी हाल होणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत जर काम झाले नाही, तर आम्ही आंदोलन करु. आश्रफ वांकर यांनीही या पुलाच्या रेंगाळण्यामागे राजकारण असल्याचे स्पष्ट करुन संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.

पुलाच्या कामात अकारण काही लोक राजकारण आणत आहेत. कोणत्या गोष्टीमुळे काम लांबले याची माहिती आजवर कधीच या लोकांनी घेतली नाही. रेल्वेचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. जाणीवपूर्वक आम्ही विलंब केला असता तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ते खपवून घेतले असते का? राजकारणासाठी असे वेठीस धरणे चुकीचे आहे. - रोहन पाटील, कंत्राटदार, चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल

Web Title: ..That why work on Chintamaninagar railway flyover was delayed, protests by BJP workers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.