जत : खलाटी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजूर खंडू सिध्दू नाईक (वय ३०) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जत पोलिसांना शनिवारी यश आले. याप्रकरणी रावसाहेब तुकाराम शिंदे (४५, खलाटी) यास अटक केली. खंडू दारूच्या नशेत नेहमी तंबाखू मागत असे. तंबाखू न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता. यातून त्याचा खून केल्याची कबुली शिंदे याने दिली आहे.
खंडू नाईक यास दारूचे व्यसन होते. ऊस हंगामात ऊस तोडणी मजूर म्हणून कामावर जाणारा खंडू हंगाम संपल्यानंतर गावी परतल्यानंतर काहीच कामधंदा करीत नव्हता. तो नेहमी दारूच्या नशेत गावातून फिरत असायचा. दारूच्या नशेत समोर दिसेल त्याला शिव्या देण्याच्या त्याच्या उद्योगामुळे ग्रामस्थ त्याला टाळत होते.
गेल्या आठवड्यात त्याचा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खंडू दारूच्या नशेत संशयित रावसाहेब शिंदे यास नेहमी काठीने मारहाण करत होता. दादागिरी करून त्याच्याकडे तंबाखू मागत असे. तंबाखू न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या सततच्या त्रासाला शिंदे कंटाळला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाईक मद्यप्राशन करून शाळेसमोर झोपल्याचे पाहून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी कबुली शिंदे याने दिली आहे.
गेल्या आठवड्यात २१ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक होती. या मिरवणुकीत शिंदे व नाईक हे दोघेही सहभागी झाले होते. गावातील नवीन जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर मिरवणूक आल्यानंतर नाईक शाळेसमोरच दारूच्या नशेत पडला होता. मिरवणुकीतील अन्य कार्यकर्ते गणपती घेऊन पुढे गेले होते. याची संधी साधून शिंदे याने नाईक याच्या डोक्यात डगड घातला. तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले होते.
दुसºया दिवशी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकामगार पोलीसपाटील भाऊसाहेब शेजूळ यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गणेश विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीतील लोक नाईक वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी खंडू नाईक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाशेजारी मोठा दगड पडला होता. हा दगड पोलिसांनी जप्त केला आहे.
घटनेनंतर गावातून गायब घटनेनंतर रावसाहेब शिंदे हा गावातून गायब झाला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. शनिवारी तो आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कांबळे यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याला रविवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. खुनामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास केला जात असल्याचे उपनिरीक्षक कांबळे यांनी सांगितले.