सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ योजनेमुळे म्हैसाळचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजले गेले. इतकेच काय तर या योजनेचे पाणीसांगली जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्या पर्यंत पोहचले. मात्र म्हैसाळ योजनेच्या उशालाच असणाऱ्या आरग, बेडग, नरवाड, लक्ष्मीवाडी या भागातील ११०० हेक्टर शेतीला पाणी नसल्याने म्हैसाळ योजना उशाला अन कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांच्यावर आली आहे.म्हैसाळ योजनेपासून जवळच असणाऱ्या या चार गावातील ११०० हेक्टर क्षेत्राला या योजनेच्या पाण्याची आवश्यकता आहे. १६ एप्रिल १९८४ साली म्हैसाळ योजना मंजूर झाली. त्यानंतर या योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांना मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील दोन तालुके ही आता या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतू जा भागातून हे पाणी जाते त्या भागातील काही शेतकरीच या योजनेपासून वंचित आहेत.सदर योजनेचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळाल्यास मिरज तालुक्यातील आरग येथील ५३१ हेक्टर,बेडग मधील २६४ हेक्टर, नरवाड मधील १६६ हेक्टर व लक्ष्मीवाडी येथील १३९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचा फायदा ऊस व द्राक्ष शेतीला होऊन या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कोट्यवधी रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना सुरू करण्यासाठी स्थापत्य विभागातील पंपग्रह व विहीर बांधणी, उध्र्वगामी नलिका, वितरण हौद व वितरण प्रणाली, यांत्रिक काम, विद्युत काम, बेडग कालवा येथे पंपग्रह उभा करून १८०० मीटर लांबीची नलिका व वितरण हौद इत्यादी कामे होण्याची गरज आहे. यासाठी अंदाजे १७ कोटी २७ लाख इतका खर्च येण्याची शक्यता आहे.
मिरज पूर्व भागातील भागातील ११०० हेक्टर क्षेत्राला पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याविना नुकसान होत आहे. सदरच्या प्रश्नां बाबत वरीष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून लवकर ही योजना म्हैसाळ प्रकल्पात समाविष्ट करण्याची विनंती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहे. - मनोज शिंदे-म्हैसाळकर, सदस्य -कृष्णा कोयना योजना जलसिंचन समिती
या कामाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी दीड वर्षा पूर्वी पाठवला आहे. पहिला हे काम म्हैसाळ योजनेच्या प्रकल्पात सामाविष्ट होणे गरजेचे आहे. त्यानंतर कामास सुरुवात होईल. काम होण्यास वेळ लागत नाही. - सुर्यकांत नलवडे, म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता -सांगली