सांगली : माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म ५० रुपये प्रोत्साहनपर पैसे देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती; पण त्यांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही.लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे पैसे आले व अजून येणे सुरूच आहे; परंतु रात्रंदिवस कष्ट करून या योजनेचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र वंचितच आहेत. शासनाने दिलेला शब्द पाळला नसल्याची त्यांची भावना आहे. सुमारे अडीच हजार सेविकांनी ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम केले होते. योजनेचे सुमारे पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. या माध्यमातून त्यांना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. रोकड हातात असल्याने महिलांचे दसरा, दिवाळीचे सण जल्लोषात साजरे होणार आहेत; पण त्यांना हे पैसे मिळवून देण्यात हातभार लावणाऱ्या सेविका मात्र कष्टाच्या पैशांची वाट पाहत आहेत.
शासनाने प्रोत्साहन भत्त्याची रक्कम त्वरित अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करावी. त्यांच्या हक्काचे पैसे द्यावेत. सेविकांची दिवाळी गोड करावी. - रेखा पाटील, जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी महासभा