दत्ता पाटीलतासगाव : प्रभागातील आरक्षण जाहीर केल्यानंतर तासगाव नगरपालिकेसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नगरपालिकेत ‘एन्ट्री’ होणारच, या आत्मविश्वासाने इच्छुक कामाला लागले आहेत. भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणारे राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे आघाडी करून लढणार का? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. आघाडीचे पेच सुटण्याआधीच या पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून रस्सीखेच सुरू केली आहे.भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे रणशिंग फुंकणार आहेत, हे स्पष्ट आहे. भाजपमध्ये काही प्रभागात प्रस्थापित तत्कालीन नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर काही प्रभागात इच्छुकांचा भरणा जास्त आहे. मात्र भाजपात खासदारांचा आदेश अंतिम ठरणार आहे.राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीतही उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी सत्तेत येणारच, अशा अविर्भावात राष्ट्रवादीचे नेतृत्व असल्यामुळे इच्छुकांचा भरणा मोठा आहे. उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतदेखील मोठी रस्सीखेच होणार आहे. मात्र गतवेळी काँग्रेसच्या मतविभागणीचा फटका राष्ट्रवादीला बसल्यामुळे आणि यावेळीदेखील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे.राष्ट्रवादी मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेसोबत जुळवून घेणार, की एकला चलो... चा नारा देणार, यावर पालिकेची पुढील समीकरणे अवलंबून आहेत. आघाडीचा पेच सुटण्याआधीच सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी सोयीस्कर मतदार संघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.तीन पक्षांचा तिढा सुटणार तरी कसा?तासगाव शहरात एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समझाेत्याचे राजकारण सुरू असल्याची चर्चा होत असते. त्यामुळे या निवडणुकीत काही कारभाऱ्यांचा सोयीस्करपणे बळी जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काही मातब्बर संधी असूनही बाजूला राहण्याच्या मानसिकतेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेनेसोबत राष्ट्रवादीकडून कसा प्रस्ताव दिला जाणार, याचेही औत्सुक्य आहे. सद्यस्थितीत आघाडीचा पेच सुटणार कसा, हा प्रश्न आहे.
Election: तासगावात महाआघाडीचा पेच, त्याआधीच उमेदवारीची रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 6:29 PM