दिलीप मोहितेविटा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व भाजप आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढविणार असल्याची घोषणा झाली असताना खानापूर मतदारसंघात मात्र भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व आटपाडीच्या देशमुख बंधूंनी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना २०२४ च्या निवडणुकीत चक्रव्यूहात अडकविण्याची तयारी केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी वेळ पडल्यास मागे-पुढे सरकण्याची तयारी दाखवीत राजकीय वातावरण ढवळून सोडले आहे.खानापूरचे आमदार बाबर यांनी २०१९ ची निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढविली होती. त्यावेळी सेना-भाजप युतीमुळे भाजपचे खासदार पाटील, आमदार पडळकर व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख या बंधूंनी बाबर यांना ताकद देऊन निवडून आणले, परंतु मध्यंतरीच्या काळात आ. बाबर यांच्याशी खा. पाटील, आ. पडळकर व देशमुख बंधूंचे वितुष्ट निर्माण झाले. त्याला यशवंत साखर कारखाना, जिल्हा बँक निवडणूक व प्रशासनावर दबाव आणून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या संघर्षाची झालर होती.दोन दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्यातील कार्यक्रमात खा. पाटील, आ. पडळकर व अमरसिंह देशमुख यांनी बाबर यांच्यावर निशाणा साधत चुकीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा दिला. त्याचवेळी पडळकर व देशमुख या दोघांनीही बाबर यांना लक्ष्य करत २०१९ ची चूक २०२४ ला करणार नसल्याचे सांगितले. बाबर यांना पुढील निवडणुकीत चक्रव्यूहात अडकविण्याची तयारी स्थानिक भाजप नेत्यांनी केल्याने बाबर चक्रव्यूह कसा भेदणार, याची चर्चा रंगली आहे.वैभव पाटील काय करणार?आटपाडीतील उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना खा. पाटील व देशमुखांनी भाजपमध्ये येण्याची थेट ऑफर दिली. त्यावेळी वैभव पाटील यांनी योग्यवेळी चांगल्या माणसांच्या पाठीशी राहू, असे सांगत प्रसंगी मागे-पुढे सरकण्याचीही तयारी दर्शविली.
खानापुरात अनिल बाबर यांच्याविरोधात भाजपचा चक्रव्यूह, राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण ढवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 6:59 PM