विकास शहा शिराळा : हौसेला मोल नसते म्हणून लग्नकार्याला मौल्यवान बनविण्याची प्रथा सर्वत्र सुरु झाली आहे. कधी अलिशान गाड्या, कधी रथ, डोली तर कधी हेलिकॉप्टरमधून आकाशभरारी घेत वधू-वरांना मंडपात आणले जाते. मात्र, या परंपरेला छेद देत ‘जुनं ते सोनं’ असा संदेश समाजाला देत अंत्री खुर्दला अनोखा विवाह सोहळा रंगला. बैलगाडीतून वधू-वरांना मंडपात आणत लेझीमच्या तालात पार पडलेला हा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील अक्षता चव्हाण व प्रशांत पाटील यांचा विवाह थाटामाटात झाला. अक्षता ही एम.बी.ए असून पुणे येथे आय. टी. कंपनीत नोकरीस आहे. तिचे वडील अशोक चव्हाण हे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आहेत. प्रशांतचे मुंबई येथे महा ई-सेवा केंद्र असून त्याचे वडील आनंदा पाटील हे शेतकरी आहे.
वधू-वर हे उच्च शिक्षित असतानाही ग्रामदेवताचे दर्शन बैलगाडीतून जाऊन घेतले. नंतर वधू-वर वऱ्हाडी मंडळींसह लग्नस्थळी बैलगाड्यांतून रवाना झाले. वाद्य म्हणून पारंपरिक लेझीमचा वापर केला. त्यामुळे लेझीम व बैलगाडीची एन्ट्री हेच सर्वांचे आकर्षण ठरले.बैलगाडीचे सजणेही जुन्याच पद्धतीचेपूर्वी वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे नववधूसह वऱ्हाडी मंडळी ही बैलगाडीतून जात. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी बैलगाडी होती. एका गाडीत सात-आठ लोक सहज बसत असत. ज्या गाडीत नववधू असायची त्या गाडीला घोंगड्या कमान करून त्यास फुगे बांधून व बैलांच्या शिंगांना सजवून त्यांच्या अंगावर झुला घालून गाडी आकर्षकपणे सजवलेली असायची. अगदी असाच काहीसा अनुभव या सोहळ्यात घेण्यात आला.विवाह सोहळ्याचे तालुक्यात कौतुकअंत्री खुर्द येथील या साध्या पद्धतीच्या पण तितक्याच शानदार विवाह सोहळ्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. हे पाऊल उचलणाऱ्या चव्हाण व पाटील कुटुंबियांचेही कौतुक केले जात आहे.