विकास शहा
शिराळा : शिराळा येथे पार पडलेल्या लोक न्यायालयात एक संसार पुन्हा उभा राहिला तर या मुलांना आई वडिलांची छत्र छाया पुन्हा मिळाली आहे. याचबरोबर ९५ प्रलंबित प्रकरणे तसेच ३०० वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ३९५ प्रकरणे मिटवण्यात आली यातून ६२ लाख ३९ हजार २६६ रुपये वसूल करण्यात आले.रेश्मा कदम (रा.सुपणे, ता. कराड , जि. सातारा) यांचा शरद कदम ( रा.भटवाडी , ता.शिराळा ) यांच्याशी विवाह झाला होता मात्र कौटुंबिक वादातून २०२१ पासून शिराळा येथील न्यायालयात खटला सुरू होता. त्यांना एक मुलगाही आहे. आज शनिवारी पार पडलेल्या लोक न्यायालयात हा वाद संपुष्टात येऊन रेश्मा या पुन्हा नांदण्यासाठी तयार झाल्या. यामुळे एक संसार पुन्हा उभा राहिला तसेच मुलाला आपले आई वडिलांची छत्र छाया ही मिळाली.हा वाद मिटल्यावर न्यायाधीश एस एस सुरजुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.यावेळी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या तोंडावर समाधानाचे हास्य पसरले होते. यावेळी न्यायाधीश एस एस सुरजुसे, न्यायाधीश विनया देसाई, ए एस घाटगे, ऍड जी एल पाटील, ऍड सुधीर पाटील, ऍड पी बी थोरात, आरती पाटील आदी उपस्थित होते.या लोक न्यायालयात १ हजार १२६ प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ८८४ वादपूर्व प्रकरणे असे एकूण ३ हजार १० प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ९५ प्रलंबित प्रकरणे तसेच ३०० वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ३९५ प्रकरणे मिटवण्यात आली. यातून ६२ लाख ३९ हजार २२६६ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.