संतोष भिसेसांगली : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांचे रडगाणे वर्षानुवर्षे कायम आहे. प्रवासी संघटनांनी कितीही कानीकपाळी शंखनाद केला, तरी रेल्वेचा हत्ती आपल्याच चालीने चालत आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली या महत्त्वाच्या स्थानकांच्या समस्यांवर अर्थसंकल्पात दिलासा देण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्या लोकप्रतिनिधी दिल्लीत ठासून मांडत नाहीत. कोल्हापूरकर नेते फक्त कोल्हापूरपुरतेच पाहतात. सांगलीकर नेत्यांना रेल्वे आपलीशी कधीच वाटलेली नाही. याचा गैरफायदा रेल्वेच्या परप्रांतीय वरिष्ठांनी नेहमीच घेतला आहे. साधे ग्रुप बुकींग करायचे म्हटले, तरी पुण्याला जावे लागते. सांगलीत फलाटांची संख्या वाढवावी, पीटलाईन सुरू करावी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात या मागण्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहेत.जम्मू-तावी-पुणे झेलम एक्सप्रेस मिरजेपर्यंत विस्तारीत करावी, सोलापूर-मिरज एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत वाढवावी, उत्तर भारतासाठी एक्सप्रेसची संख्या वाढवावी, मुंबईसाठी दिवसा आणखी एक एक्सप्रेस सुरू करावी अशा अनेक मागण्यांची जंत्री रेल्वेकडे पडून आहे. विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकात त्यावर चर्चा होतात. निर्णय मात्र काहीही होत नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या मिरज स्थानकाविषयी तर अधिकाऱ्यांना प्रचंड आकस आहे. साधे कोच इंडिकेटर्सही बसविलेले नाहीत. मिरज-शिरोळदरम्यान उड्डाण पुलाची मागणी वर्षानुवर्षे अनिर्णित आहे. पुणे-लोंढा मार्गाच्या दुहेरीकरणाची कामे सुरू आहेत, पण यादरम्यानच्या स्थानकांच्या विकासासाठी काहीही तरतूद केली जात नाही. मिरज ते सोलापूर विद्युतीकरण पूर्ण झाले, पण पुणे-मिरज दरम्यानचे मंद गतीने सुरू आहे. मिरज-पंढरपूर रुंदीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, पण अवघ्या चारच प्रवासी दैनंदिन गाड्या धावत आहेत.
स्वतंत्र अर्थसंकल्प नसल्याचा तोटा
रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जात असल्याच्या काळात सांगली, कोल्हापूरसाठी तरतुदी व्हायच्या. सध्या केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचीही मांडणी केली जाते, त्यामुळे रेल्वेच्या गरजांवर सखोल विचार होताना दिसत नाही.
अर्थसंकल्पात यावर विचार होईल?
- मिरज व सांगलीतून लांब पल्ल्याच्या गाड्या
- सांगली स्थानकाचा विस्तार व पीटलाईन
- कोल्हापूर - मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण
- इचलकरंजीसाठी नवा लोहमार्ग
- सोलापूर-मिरज एक्सप्रेसचा साताऱ्यापर्यंत विस्तार
- जम्मू-तावी पुणे झेलम एक्सप्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार
- सांगली-कोल्हापूरदरम्यान पॅसेंजरना बोगी वाढविणे
- कोल्हापूर - मुंबईदरम्यान दिवसा आणखी एक एक्सप्रेस
- मिरज-जत-विजापूर नवा मार्ग