Sangli Politics: लोकसभेचा निकाल बिघडवणार आगामी विधानसभेची गणिते
By अशोक डोंबाळे | Published: June 6, 2024 04:01 PM2024-06-06T16:01:44+5:302024-06-06T16:02:57+5:30
जिल्ह्यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज : विद्यमान आमदारांची वाढली डोकेदुखी
अशोक डोंबाळे
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील विजय झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्वच गणिते बिघडणार आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीतील दुस-या फळीतील इच्छुकांची संख्या वाढल्याने विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे. खानापूर, मिरज, सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय पाटील यांनी २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा नेतृत्व केले. २०२४ च्या निवडणुकीत त्यांची हॅट्ट्रिक होणार होती, पण पक्षातंर्गतच विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्ट्रिक हुकली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला. हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले.
जतमध्ये सावंत यांना धोक्याची घंटा..
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही जत विधानसभा मतदारसंघाने विशाल पाटील यांना हुलकावणीच दिली. २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पाठबळ विशाल पाटील यांच्या पाठीशी होते तरीही भाजपचे संजय पाटील यांनी सहा हजार २७१ मताधिक्य घेतले. हे मताधिक्य सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
मताधिक्याचा खाडे, गाडगीळ यांना फटका
सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असतानाही अपक्ष विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. या मताधिक्याचा पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
विश्वजीत कदमांचे वर्चस्व कायम
पलूस-कडेगावमधून ३६ हजार १८२ मताचे मताधिक्य देऊन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी वर्चस्व दाखवून दिले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी पलूस-कडेगावचे मताधिक्य चिंतेचा विषय आहे.
तासगावात नवे समीकरण..
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा मावळते खासदार संजय पाटील यांचा बालेकिल्ला आहे. पण, येथेही नऊ हजार ४११ मतांचे मताधिक्य विशाल पाटील यांना देण्यात आर. आर. पाटील गट यशस्वी झाला आहे. आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे.
खानापूरमध्ये बाबर गटाचेच वर्चस्व
खानापूर विधानसभा मतदारसंघातून स्वर्गीय अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर हे महायुतीच्या व्यासपीठावर होते. पण, त्यांच्या समर्थकांनी विशाल पाटील यांनाच बळ दिल्याचे मताधिक्यावरुन स्पष्ट होत आहे. आटपाडीतून जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मताधिक्य देऊन आपली ताकद दाखवून दिली आहे.
२०२४ निवडणुकीतील मतदान
विधानसभा मतदारसंघ - संजय पाटील - विशाल पाटील - चंद्रहार पाटील
मिरज - ८४०२९ - १०९११० - ८०२१
सांगली - ८५९९३ - १०५१८५ - ७१५६
पलूस-कडेगाव - ५९३७६ - ९५५५८ - १३८५९
खानापूर - ७५७९५ - ९२४५९ - १६९५६
तासगाव-कवठेमहांकाळ - ८५०७४ - ९४४८५ - ७९४९
जत - ७९१२५ - ७२८५४ - ६१७४