सांगली : विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि बांगलादेशी तरुणींची तस्करी उघडकीस आल्यामुळेच पुजारी यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे समजते. विश्रामबागच्या निरीक्षकपदी आता संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हे आदेश दिले.पुजारी आता जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत, तर जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक सुधीर भालेराव यांची मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.बांगलादेशहून नोकरीच्या आमिषाने तरुणींना सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. तेथून आलेल्या घरमालकिणींनी तरुणींचे बनावट आधार कार्ड बनवून हा प्रकार सुरू केला आहे. ‘लोकमत’ने या प्रकारावर जोरदार आवाज उठविला होता. यानंतर गेल्याच आठवड्यात विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्नील कोळी याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडून खंडणी घेतल्याबद्दल अटक करण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशी तरुणींचे प्रकरण चव्हाट्यावर आले.दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर गुरुवारी रात्री अधीक्षक डॉ. तेली यांनी पुजारी यांच्या बदलीचे आदेश दिले.
Sangli News: बांगलादेशी तरुणींच्या तस्करीचे प्रकरण भोवले, पोलिस निरीक्षक पुजारी यांची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 3:51 PM