सांगली : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगलीतील नाराजांची यशस्वी मनधरणी केली, मात्र विरोधी काँग्रेसमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वातावरण बिघडले आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर कायम राहणार आहे.सांगली विधानसभा मतदारसंघ नेहमीच राज्यभर लक्षवेधी ठरला आहे. मागील निवडणुकीतही या मतदारसंघात मोठी चुरस दिसून आली होती. यंदाही अनेक नाट्यमय घडामोडी या मतदारसंघात नोंदवल्या गेल्या. विद्यमान आमदारांनी निवडणुकीपासून फारकत जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी सरावाला सुरूवात केली. पक्षाने गाडगीळ यांनाच उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. काही नाराजांनी स्वत:हून खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य केली. मात्र, पक्षात उर्वरित नाराजांची संख्या मोठी होती. त्यामुळे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक नाराज नेत्याची भेट घेऊन पक्षातील संभ्रम दूर केला.
काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील या दोन गटात संघर्ष सुरू होता. एकमेकांवर जहरी टीका करण्यापर्यंत वाद टोकाला गेले. उमेदवारीच्या दावेदारीत पक्षांतर्गत वातावरण ढवळून गेले. पक्षाने शनिवारी येथील उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना दिल्यानंतर जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरीचे निशाण फडकवले. गेला महिनाभर हा वाद सुरू असताना पक्षाच्या एकाही वरिष्ठ नेत्याने हा वाद थांबविण्यासाठी प्रयत्न केला नाही. स्थानिक नेत्यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. आता पक्षातील बंडखोरी थोपवण्याचे आव्हान हे वरिष्ठ नेते स्वीकारणार की आहे त्या परिस्थितीत निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
लोकसभा अन् विधानसभेचे चित्र वेगळेसांगली लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी मित्रपक्षाच्या उमेदवाराला विरोध करत बंडखोरी केली होती. त्यावेळी त्यांनी पक्षात कोणालाही उमेदवारी दिली तर माघार घेण्याची भूमिका जाहीर केली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र सांगली मतदारसंघात पक्षातील अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड पुकारण्यात आले आहे.