सांगली : नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगलीत २५ कोटींचे एक आलिशान नाट्यगृह साकारत आहे. त्यासाठी नियोजित हनुमाननगर येथील जागेमध्ये मार्किंगचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आले. लवकरच बांधकामास सुरुवात होणार आहे.या भागातील नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी नितीन शिंदे, नकुल जकाते, महेश मदने, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी बुधवारी हनुमाननगर ऑक्सिडेशन पाँडजवळील नाट्यगृहासाठी आरक्षित जागेची पाहणी केली. या नाट्यगृहाबाबतचा प्रस्ताव आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार, जनसुराज्यचे युवा नेते समित कदम यांनी दिला होता.गतवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. २५ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यासंदर्भात मागील महिन्यात परिपत्रक निघाल्यानंतर आता प्रत्यक्ष नाट्यगृह उभारणीसाठी पावले पडत आहेत.
कसे असेल नवे नाट्यगृहअभिजित भोसले यांनी सांगितले की, नवे नाट्यगृह ७५० आसन क्षमतेचे असेल. कॅफेटेरिया, फूड झोन, प्रशस्त पार्किंग, खुले थिएटर, कॅम्पस गार्डन, कलाकारांना राहण्यासाठी ६ खोल्या, ग्रीन रूम, मेकअप रूम, प्रोजेक्शन आणि चित्रपट सुविधा असेल. नाट्यगृह परिसरात आद्य नाटककार विष्णुदास भावे, नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल, नटश्रेष्ठ बालगंधर्व, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे पुतळे उभारले जाणार आहेत.