अण्णा खोतमालगाव : मिरज तालुक्यात अनुदान रखडल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात उदासीन असल्याचा आरोप होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत तालुक्यात २०२२-२३ या वर्षात २५० घरकुलांना मंजूरी देण्यात आली. मंजुरीनंतर बांधकामे गतीने सुरु झाली. सध्या बरीच घरकुले पुर्णत्वाकडे आली आहेत. मात्र त्यांचे हप्ते तटले आहेत. त्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात अनुदान मिळत नसल्याने बांधकामासाठी उसनवारी केलेल्या लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. वेळेत अनुदानासाठीते पंचायत समितीत हेलपाटे मारत आहेत. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही, पण संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या रोषाचे धनी व्हावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेकडूनही यशवंत, वसंत घरकुल योजनांचे अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाच्या उदासिनतेने लाभार्थ्यांत नाराजी आहे. मोदी आवास योजनेच्या २५० लाभार्थ्यांपैकी सुमारे १०० जणांनी पहिला हप्ता घेऊनही घराचे बांधकाम सुरु केलेले नाही. त्यांना प्रशासनाने वारंवार लेखी सूचना दिल्या आहेत. बांधकामास सुरु न करणाऱ्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. घेतलेल्या वसुली करुन गुन्हे दाखल करण्याचाही इशारा दिला आहे.