सांगली : महापालिकेच्या एलईडी प्रकल्पावरून गेल्या महिन्याभरात बरेच वादंग निर्माण झाले. सहा महिन्यापूर्वी प्रकल्पाची मुदत संपली होती. ठेकेदार कंपनीने काम थांबविले होते. त्यात स्थायी समितीने दोनदा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता. अखेर शुक्रवारी शासन अटीच्या आधीन राहून मुदतवाढीला स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम उद्या, शनिवारपासून सुरू होईल, असे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले.महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे. या प्रकल्पाचे काम सहा महिने बंद आहे. ठेकेदाराने अजून १७ हजार दिवे बसविलेले नाहीत. त्याला पाच कोटीचे बिल अदा करण्यात आले आहे. प्रशासनाने ठेकेदार कंपनीशी चर्चा करून प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. पण स्थायी समितीने प्रकल्पाला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता.
शुक्रवारी स्थायी सभेत एलईडी प्रकल्पावर चर्चा झाली. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींची झाडाझडती घेण्यात आली. शासन अटीच्या अधीन राहून प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.सभापती सूर्यवंशी म्हणाले की, शहरात ४८ हजार दिवे बसविले जाणार आहेत. २०० फिडरचे काम महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे. तर दिवे बसविण्याचे काम शनिवारपासून सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.