इस्लामपूर (सांगली) : कोकरूड (ता. शिराळा) येथे १४ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्यावतीने येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेला पुनरावलोकन (रिव्हिजन) अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. शिराळा न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यातून ठाकरे यांना दोषमुक्त करावे, अशा आशयाचा हा अर्ज होता. राज ठाकरे यांच्याविरुध्द कोकरुड पोलिस ठाण्यात २१ ऑक्टोबर २००८ रोजी भारतीय दंडसंहिता कलम १४३,१०९ व ११७ आणि मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये फिर्याद दाखल आहे. त्यानुसार ठाकरे यांच्याविरुध्द शिराळा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे, मात्र अद्याप त्यांच्याविरुध्द दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. या खटल्यातून ठाकरे यांना दोषमुक्त करावे यासाठी त्यांच्यावतीने इस्लामपूर येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात पुनरावलोकन अर्ज दाखल होता.फिर्यादीमध्ये ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. यामुळे त्यांच्याविरुध्द दोषारोप निश्चिती करू नये, असा युक्तिवाद ठाकरे यांच्या वकिलांनी केला. त्यावर सरकार पक्षाच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सांगितले की, ठाकरे यांचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत जोपर्यंत खटल्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या सहभागाबाबत मत नोंदविता येणार नाही. त्याचप्रमाणे ही फिर्याद सन २००८ मध्ये दाखल असल्याने आजपर्यंत ठाकरे यांच्यावतीने दोषारोप निश्चितीबाबत कोणताही प्रतिसाद आलेला नाही.यामुळे त्यांच्याविरुध्द दोषारोप ठेवून ही फिर्याद गुणदोषावर चालणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा दोषमुक्त होण्याचा अर्ज नामंजूर करावा. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांचा दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज नामंजूर केला.
राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका! 'या' प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला
By श्रीनिवास नागे | Published: February 03, 2023 6:43 PM