मिरज: मिरजेत रूढी व परंपरा तोडून परदेशी कायस्थ समाजातील मुलीने लंडन येथून येऊन पित्याच्या देहाला अग्नी देत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. या घटनेने वर्षानुवर्षे परंपराच्या जोखडाखाली असलेल्या परदेशीकायस्थ समाजातही परिवर्तनाचे बीज रोवले गेले.मिरजेतील बोलवाड रस्त्यावरील शामलाल काशिलाल कायस्थ (वय ५५) यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. रजपूत परदेशी - कायस्थ समाजात पित्याच्या देहाला अग्नी देण्याचा अधिकार मुलाला आहे. मृत शामलाल यांची मुलगी श्वेता लंडन येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. पत्नी त्रेशा याही मुलीकडे लंडनला गेल्या होत्या. यामुळे शामलाल कायस्थ यांच्या अंत्यसंस्कारासाठी समाजाने मुलगी श्वेता लंडनहून येण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला.श्वेता ही आईसह बुधवारी दुपारी मिरजेत आली. शामलाल यांच्या मुलाचेही निधन झाले असल्याने शामलाल यांच्या देहाला अग्नी कोण देणार? असा प्रश्न उपस्थित झाला. समाजात मुलगा-मुलगी समानतेचे वारे वाहत असताना आपण अजूनही रूढीपरंपरा जपून मुलीचा अधिकार डावलायचे का? असा मुद्दा कायस्थपरदेशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते शंकरलाल परदेशी यांन उपस्थित करत मुलगी श्वेत हिच्याकडूनच पिता शामलाल यांच्य देहाला अग्नी देण्याबाबत समाजाला आवाहन केले. परदेशी - कायस्थ समाजानेही या बदलाचे समर्थन केल्याने पित्याच्या चितेला मुलगी श्वेता हिने अग्नी दिला.यांनी घेतला पुढाकार संजयलाल परदेशी, नरेंद्र परदेशी, बिंदूलाल परदेशी, गणेश परदेशी, पुरुषोत्तम परदेशी, मुकुंद परदेशी, नंदलाल परदेशी, संतोष कायस्थ, दीपकलाल परदेशी, प्रकाशलाल परदेशी, राजू हजारी, अष्टविनायक कायस्थ, राजू परदेशी, अनिल परदेशी, मनोज परदेशी यांनी यासाठी पुढाकार घेतला.
रूढी, परंपरा तोडून पित्याच्या चितेला मुलीने दिला अग्नी; परदेशी कायस्थ समाजात बदलाचे वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 1:15 PM