सांगली : अहमदनगर जिल्ह्यातून सौद्यासाठी हळद घेऊन आलेल्या शेतकऱ्याला आरटीओने अडवून ३० हजार रूपयांचा दंड केल्याबद्दल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी संताप व्यक्त केला. सावळी येथील आरटीओ कार्यालयातच हळदीचे पोते पालथे करत सौदा करा आणि त्यातून पैसे घ्या, तुम्हाला पगार कमी पडला आहे, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर अधिकारी वरमले हाेते.अहमदनगर जिल्ह्यातील राहूरी तालुक्यातील शिवाजीराव यादवराव वने हळद घेऊन सांगलीत सौद्यासाठी येत होते. सावळी येथे ते आले असता, महिला अधिकाऱ्याने त्यांना अडवून वाहन ओव्हरलोड असल्याचे सांगितले. वाहनाचे वजन करावे लागेल, असे म्हणत त्या वाहन घेऊन गेल्या, तर शेतकरी वने रिक्षा करून तिथे गेले. तेथे वाहनात जादा माल असल्याचे लक्षात आले व त्या वाहनाचा विमाही संपल्याचे अधिकाऱ्याने सांगत वने यांना ३० हजार रूपयांचा दंड केला.या प्रकाराने गोंधळलेल्या वने यांनी हा प्रकार खोत यांना सांगितला. यावर खोत यांनी सावळी येथील आरटीओ कार्यालय गाठत हळदीची पोती रिकामी करत सौदा पुकारला. या सौद्यातून आरटीओंना पैसे द्यायचे आहेत, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना सरकार आवरणार का?राज्यातील शेतकरी अगोदरच निसर्गाच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यात अशी अडवणूक होत असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना सरकार आवरणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आरटीओ कार्यालयातच केला हळदीचा सौदा, सांगलीत अहमदनगरच्या शेतकऱ्याला अडविल्याने आंदोलन
By शरद जाधव | Published: April 12, 2023 5:34 PM