कुरळप (सांगली) : कोरोनाच्या कालावधीनंतर प्रथमच होणाऱ्या परीक्षांमध्ये चालणारा कॉपीचा गैरप्रकार रोखण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांकडील मोबाइल ॲपवरील कॅमेऱ्यातून वर्गावर नजर ठेवली जाणार आहे. यामुळे कॉपीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षार्थींच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे. यामध्ये बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी, तर इयत्ता दहावीची २ मार्चपासून सुरू होणार आहे.अनेक केंद्रांवर परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना खुलेआम बिनधास्तपणे कॉपीचा पुरवठा केला जातो. याचा परिणाम हुशार विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. त्याच्या अभ्यासाच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर कॉपीसारखे गैरप्रकार टाळून हुशार विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कमी करण्यासाठी यंदा परीक्षा मंडळाने प्रथमच कॉपीमुक्तीसाठी परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षकांसह मोबाइल ॲप कॅमेऱ्याचेही लक्ष राहणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांचे परीक्षेआधीच धाबे दणाणले असून, हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाने राबवलेल्या नवतंत्राचे स्वागत केले आहे.संगनमताने गैरप्रकार
यापूर्वी परीक्षार्थी व पर्यवेक्षक यांच्या संगनमताने विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीसारखे गैरप्रकार सुरू होते. त्यामुळे परीक्षेमध्ये गुणात्मक नव्हे तर कॉपीच्या मदतीने टक्केवारी वाढली होती. अशा फुगीर टक्केवारीमुळे कॉपीबहाद्दर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन हवेत तरंगत होते. यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हे विद्यार्थी टिकत नसल्याचे दिसून आले आहे.