तासगाव (सांगली) : पुणदी (ता. तासगाव) येथील तलावात ताकारी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी पुणदीच्या ग्रामस्थांनी बुधवारपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. ताकारीच्या वाहत्या कालव्यामध्ये उतरून ठिय्या मारला असून, मागण्या मान्य होईपर्यंत कालव्यातच राहण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.ताकारी योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचे पाणी पुणदी तलावात सोडले नाही. सध्या तलावात पाणीसाठा अल्प असून, पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गावाच्या परिसरात असणाऱ्या सर्व वितरिकांना वेल्डिंग केले आहे. योजनेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या अन्य गावांत मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना त्यांना पाणी दिले जाते. मात्र, आमच्यावर नेहमी दुजाभाव केला जात आहे, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी ताकरीच्या पाण्यात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.तलावात ३० एमसीएफटी पाणी सोडा, नियमबाह्य दंड रद्द करा, गावाशी सूडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, या प्रमुख मागण्यांसाठी पुणदीतील ग्रामस्थांनी ताकारी योजनेच्या वाहत्या कालव्यामध्ये ठिय्या मारला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत.
शेतीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा चक्क ताकारी योजनेच्या कालव्यात ठिय्या, कालव्यातच राहण्याचा निर्धार
By श्रीनिवास नागे | Published: June 07, 2023 5:17 PM