मिरज (जि. सांगली) : अजगराला मारून जाळल्याप्रकरणी रत्नागिरी वन विभागाकडून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगलीतील प्राणिमित्र ॲड. बसवराज होसगौडर यांनी रत्नागिरी वन विभागाकडे तक्रार केली होती.रत्नागिरी जिल्ह्यात तिसंगी (ता. खेड) या गावात संशयित तरुणाने अजगर मारून जाळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याबाबत ॲड. होसगौडर यांनी सांगलीचे सहाय्यक वनरक्षक डॉ. अजित साजणे यांच्यामार्फत रत्नागिरीच्या सहाय्यक वनरक्षकांकडे या घटनेची तक्रार केली.रत्नागिरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौजे तिसंगी (निकमवाडी, ता. खेड) येथे संशयित महेश राजाराम निकम याच्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर कदमने एक महिन्यापूर्वी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याने घराच्या मागील बाजूस शेतात खड्डा काढून पुरलेले मृत अजगर पंचनामा करून वन विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत अजगराचे अवशेष, फावडे व कुदळ जप्त करण्यात आली. रत्नागिरीचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, दापोली परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, खेडचे वनपाल सु. आ. उपरे, वनरक्षक अशोक ढाकणे यांनी ही कारवाई केली.
अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल
By श्रीनिवास नागे | Published: September 08, 2022 5:17 PM