वांगी : शेळकबाव (ता. कडेगाव) येथे शेतात मशागतीचे काम करीत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून संदीप सीताराम राठोड (वय ३५, मूळ रा. पांढुर्णा, ता. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. भाळवणी नमाज, टेक) हा युवक ठार झाला. काल, रविवारी (दि.२६) ही घटना घडली.याबाबत चिंचणी - वांगी पोलिसांतून मिळालेले माहिती अशी, शेळकबाव येथील शेतकरी शंकर भीमराव कदम यांच्या वडाचे माळ शिवारात असणाऱ्या रिकाम्या शेतात मशागतीसाठी त्यांनी भाळवणी (ता. खानापूर ) येथील मक्सुद मन्सूर शिकलगार यांना सांगितले होते. त्यांनी रविवारी (दि.२६) त्यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ सीएन ६६२९) चालक संदीप सीताराम राठोड यास मशागतीसाठी पाठवून दिले होते. चालक संदीप याने त्याचा मुलगा जयदीप राठोड (वय ७) यास सोबत घेऊन आला होता. व त्यास तेथेच शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसविले होते. दुपारच्या सुमारास संदीपने रोटरने मशागत करण्यास सुरुवात केली. थोडी मशागत झाली त्यानंतर शेतमालक बांधावर ठेवलेली पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले. रानात मोठा दगड लागला म्हणून संदीप राठोड हा रोटर चालू ठेवून खाली उतरला व दगड टाकून पुन्हा ट्रॅक्टरवर बसण्यासाठी जाताना त्याचा तोल जाऊन तो खाली चालू रोटरमध्ये पडला. त्यामुळे त्याचे शीर धडावेगळे झाले, तर छातीचा भाग पूर्ण छिन्नविछिन्न झाला होता. त्यात तो जागीच ठार झाला.संदीप अडकलेला पाहून त्याचा मुलगा मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाजाने शेतमालक पळत रोटरजवळ आला. तेव्हा संदीप हा ट्रॅक्टरवर दिसला नाही व ट्रॅक्टर हा बंद अवस्थेत होता, म्हणून रोटरकडे पाहिले असता संदीप हा रोटरमध्ये अडकून मयत झाला असल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहिती शंकर कदम यांनी तातडीने चिंचणी-वांगी पोलिसांत दिली. चिंचणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार व पोलिस हवालदार गणेश तांदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तर तपासणीसाठी चिंचणी-वांगी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
Sangli: मशागत सुरु असताना तोल गेला, रोटरमध्ये सापडून चालक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 3:44 PM