सांगली : मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयातील कर्मचारी व संभाजी ब्रिगेडच्या कामगार आघाडीतर्फे वेतनाच्या मागणीसाठी रुग्णालय प्रवेशद्धारात बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशीही प्रशासन व कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलनाची दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवारी मुंडण केले.सव्वाशे वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन (वॉन्लेस) रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लौकिक मिळविला. दिल्लीस्थित चर्च ऑफ नॉर्थ इंडियातर्फे संचलन करण्यात येणारे पाचशे खाटांची सोय असलेले वॉन्लेस रुग्णालय गैरव्यवस्थापन व रुग्णसंख्या कमी झाल्याने गेल्या दहा वर्षांत मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. सद्य:स्थितीत रुग्णालयावर कोट्यवधींचे कर्ज असून, त्यापैकी सुमारे २० कोटींवर कामगारांची देणी आहेत.रुग्णालयातील पाचशेवर कर्मचाऱ्यांना गेले वर्षभर वेतन मिळालेले नाही. यामुळे वेतनाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. मात्र तोडगा निघाला नसल्याने आठ दिवस उपोषण सुरू आहे. कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी उपोषण करावे लागत असून, या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी मुंडण केल्याचे कर्मचारी संघटनेने सांगितले.मिरज शासकीय रुग्णालयातील राज्य चतुर्थ कर्मचारी महासंघाचे प्रमुख संजय व्हनमाने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. रुग्णालय प्रशासन व कामगार मंत्र्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
कामगारमंत्र्यांच्या निषेधार्थ मिरजेत ‘वॉन्लेस’च्या कर्मचाऱ्यांनी केलं मुंडण, उपोषण सुरूच
By श्रीनिवास नागे | Published: November 15, 2022 2:39 PM