सांगली - आष्टा (ता. वाळवा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दत्त मंदिरासमोरील खुल्या जागेत रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा अज्ञात शिवभक्तांनी बसवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आष्टा शहरातील चव्हाणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समितीच्या वतीने उभारण्यात येणार आहे.
दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन झाली होती. या समितीच्या वतीने अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत नगरपालिकेत ठराव झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणीही करण्यात आली आहे. मात्र अद्याप या जागेला मंजुरी मिळालेली नाही. पुतळ्यासाठी मान्यवरांकडून लाखो रुपयाची देणगीही देण्यात आली आहे. पुतळा समितीच्या वतीने कोल्हापूर, वारणानगर, वडगाव यासह तासगाव, सांगली या परिसरातील पुतळ्यांची पाहणी करून कोल्हापूर येथील शिल्पकारांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चाही झाली आहे.
मात्र अद्याप शासनाने जागेला मान्यता दिलेली नसल्याने पुतळा उभारणीचे काम सुरू झालेले नाही याबाबत सत्ताधारी व विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगलेला असताना रविवारी पहाटे अज्ञातांनी दत्त मंदिरासमोरील खुल्या जागेत असलेल्या कारंजावर छत्रपतींचा सिंहासनारूढ पुतळा बसवला. या ठिकाणी शिवप्रेमींसह युवकांनी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोणी बसवला याबाबत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असला तरी शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालिका प्रशासनाने व पुतळा समितीने लवकरच शहरात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी होत आहे. दत्त मंदिरासमोरील पुतळा बसवलेल्या ठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.