आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्याला कृषी विभागातून अनुदान मिळवून देतो, असे सांगून चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी भागेश रामजी नांदवडेकर (वय ३२, रा. राजीव गांधीनगर, साळुंखे गल्ली, कळंबा, कोल्हापूर) या भामट्यास आटपाडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेती औजारे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते. यासाठी खरेदी केलेल्या अवजारांची बिले जोडावी लागतात. यासाठी शेतकऱ्यांना बिले देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये शेतकऱ्याकडून उकळले आहेत. याबाबत सोमनाथ नानासाहेब मोरे (रा. शेटफळे, ता. आटपाडी) याने आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली होती.भागेश नांदीवडेकर याने सोमनाथ मोरे यांना तो बोरस्ते कंपनीचा डीलर असल्याचे सांगितले होते. मोरे यांनी नांदीवडेकर यांच्या बँक खात्यामध्ये ब्लोअर (औषध फवारणी यंत्र) खरेदीपोटी दोन लाख ८० हजार रुपये जमा केले होते. मात्र नांदीवडेकर याने सोमनाथ मोरे यांना ब्लोअर दिलाच नाही. शिवाय अनुदानासाठी लागणारे बिलेही न दिल्याने शासनाकडून मिळणारे अनुदान एक लाख २५ हजार व ब्लोअर खरेदीपोटी दिलेले दोन लाख ८० हजार रुपये अशी चार लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली आहे.या गुन्ह्याच्या अनुषंगाने भागेश नांदीवडेकर याला रविवारी कोल्हापूर येथून अटक करण्यात आली. आटपाडी न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेश आवळे करीत आहेत.
डायल ११२च्या गैरवापराबाबतही गुन्हा दाखलदरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी याच महाभागाने पत्नीच्या समवेत आपत्कालीन पोलिस यंत्रणेच्या डायल ११२ला फोन करत माझ्या पत्नीवर बलात्कार होत असून, आम्हाला तात्काळ मदत हवी असल्याची खोटी तक्रार दिली होती. या अनुषंगाने त्यावेळी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये रुक्मिणी भागेश नांदीवडेकर व भागेश नांदीवडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.