VidhanSabha Election 2024: सांगली जिल्ह्यातील आठ आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई, पक्ष वाढल्याने सर्वत्र चुरस
By हणमंत पाटील | Published: October 16, 2024 04:10 PM2024-10-16T16:10:25+5:302024-10-16T16:15:13+5:30
सांगलीची जनता महायुती की महाविकास आघाडीला विजयी गुलाल लावणार, याचीच उत्सुकता
हणमंत पाटील
सांगली : विधानसभा निवडणुकीचे बिगुल मंगळवारी वाजले असून, दि. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. लोकसभेला महायुतीची घोडदौड सांगलीत रोखली. लोकसभेला जिल्ह्यातील आठ पैकी सात मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मागे पडले. त्यामुळे विधानसभेला जिल्ह्यातील महायुतीचे नेते सावध झाले आहेत. परंतु, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेली सांगलीची जनता महायुती की महाविकास आघाडीला विजयी गुलाल लावणार, याचीच उत्सुकता आहे.
लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रत्येक निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते. लोकसभेला मतदार राष्ट्रीय मुद्द्यांचा आधार घेऊन मतदान करतात. परंतु विधानसभेला मतदारसंघातील व तालुक्यातील प्रमुख प्रश्नांवर निवडणूक लढविली जाते. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यातील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. लाडकी बहीण, कृषिपंपाची वीज बिले माफ, तीन गॅस सिलिंडर मोफत, मुलींचे शिक्षण मोफत अशा थेट लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या.
याशिवाय विविध समाज घटकांना व कामगार संघटनांना स्वतंत्र महामंडळांची घोषणा केली. आचारसंहितेपूर्वी महायुतीने सात आमदारांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने मिरजेतून माजी महापौर इद्रीस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिली. महिन्याभरात एकामागून एक लाभाचे निर्णय घेतले. त्यापार्श्वभूमीवर मतदार कोणाला कौल देणार याची उत्सुकात ताणली आहे.
भाजप, कॉंग्रेस व शरदचंद्र पवार गटांत रस्सीखेच..
जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन, कॉंग्रेसचे व भाजपचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर शिंदेसेनेचे एक आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे एक असे जिल्ह्यातील राजकीय संख्याबळ आहे. मात्र, उद्धवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही.
यांची प्रतिष्ठा पणाला..
आमदार सुधीर गाडगीळ : सांगली विधानसभेत सलग दोनवेळा विजयी झालेले आमदार सुधीर गाडगीळ यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. मात्र, त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय जाहीर केला. परंतु, गाडगीळ यांना पर्याय नसल्याने पुन्हा त्यांना मैदानात उतरविले जाणार असल्याची चर्चा आहे.
आमदार सुरेश खाडे : पालकमंत्री असलेले सुरेश खाडे हे सलग चारवेळा आमदार झाले आहेत. पाचव्यांदा आमदार होण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून त्यांना विविध खात्यांचा कारभार पाहण्याचा अनुभव आहे.
आमदार जयंत पाटील : जिल्ह्यात सलग सातवेळा निवडून आलेले आमदार म्हणून जयंत पाटील यांचा नावलौकिक आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास व जलसंपदा अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी मंत्री म्हणून पाहिलेला आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
आमदार डॉ. विश्वजित कदम : काँग्रेसचे कडेगाव-पलूस मतदासंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले युवा आमदार आहेत. युवक प्रदेशाध्यक्षपदी अनेक वर्षे त्यांनी काम केलेले आहे. त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. आगामी निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
आमदार मानसिंगराव नाईक : हे शिराळा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. आगामी निवडणुकीत हॅट्ट्रिक करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
विक्रमसिंह सावंत : जत मतदारसंघातून अनेक वर्षांनंतर काँग्रेसचे आमदार म्हणून विक्रमसिंह सावंत निवडून आले. मात्र, सांगली लोकसभा निवडणुकीत केवळ जत मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली. त्यामुळे सावंत यांच्यापुढे पुन्हा निवडून येण्याचे आव्हान आहे.
युवा नेते रोहित पाटील : तासगाव मतदारसंघातून सलग दोन वेळा सुमनताई पाटील आमदार म्हणून निवडून आल्या. आगामी निवडणुकीत त्यांचा पुत्र रोहित पाटील रिंगणात उतरणार आहे. ही निवडणूक त्यांचे भवितव्य व अस्तित्वाची आहे.
युवा नेते सुहास बाबर : जिल्ह्यातील शिंदेसेनेचे एकमेव आमदार अनिल बाबर यांचे जानेवारी २०२४ मध्ये निधन झाले. त्यांच्या जागेवर वारसदार म्हणून पुत्र सुहास बाबर हे रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक त्यांच्या भवितव्याची व अस्तित्वाची असणार आहे.
संभाव्य लढती
सांगली : भाजप विरुद्ध पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील (काँग्रेस)
मिरज : भाजप विरुद्ध मोहन वनखंडे (कॉंग्रेस)
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध निशिकांत पाटील (भाजप), आनंदराव पवार, गौरव नायकवडी (शिंदेसेना)
शिराळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख (भाजप)
तासगाव-कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध प्रभाकर पाटील (भाजप), प्रताप पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष), अजितराव घोरपडे (अपक्ष).
पलूस-कडेगाव : काँग्रेस विरुद्ध संग्राम देशमुख (भाजप), शरद लाड (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
जत : काँग्रेस विरुद्ध गोपीचंद पडळकर, विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे, तम्मनगोडा रवी-पाटील (भाजप)
खानापूर : शिंदेसेना विरुद्ध राजेंद्र देशमुख, सदाशिव पाटील, वैभव पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
सध्याचे बलाबल
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट : ०३
- काँग्रेस : ०२
- भाजप : ०२
- शिंदेसेना : ०१
हे संभाव्य नवीन चेहरे असतील रिंगणात..
रोहित पाटील, सुहास बाबर, सम्राट महाडिक, वैभव पाटील, प्रभाकर पाटील
दोन आमदार रिंगणातून बाहेर..
मावळत्या सभागृहातील आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याने पुत्र सुहास बाबर उमेदवार असणार आहेत. आमदार सुमनताई पाटील यांनी पुत्र रोहित पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे केले.
कुणाचा किती विजयाचा रेट..
नेते : लढले : जिंकले
जयंत पाटील ०७ - ०७
सुरेश खाडे ०४ - ०४
विश्वजित कदम ०२ - ०२
सुमनताई पाटील ०२ - ०२
सुधीर गाडगीळ ०२ - ०२
मानसिंगराव नाईक ०३ - ०२
विक्रम सावंत ०२ - ०१
अनिल बाबर : ०७ - ०४
सप्टेंबर २०२४ अखेरची मतदार संघनिहाय मतदार संख्या
मतदार संघ : पुरुष : स्त्रिया : एकूण
मिरज - १ लाख ७० हजार ८७३, १ लाख ७० हजार ८८३, ३ लाख ४१ हजार ७८७
सांगली : १ लाख ७७ हजार १०६ - १ लाख ७७ हजार ६७८ : ३ लाख ५४ हजार ८५८
इस्लामपूर : १ लाख ४१ हजार २१२ - १ लाख ३८ हजार ४७३ : २ लाख ७९ हजार ६९१
शिराळा : १ लाख ५५ हजार ३७६ - १ लाख ४९ हजार ८२९ : ३ लाख ०५ हजार २०८
पलूस-कडेगाव : १ लाख ४५ हजार ५६३ - १ लाख ४६ हजार ०४२ : २ लाख ९१ हजार ६१३
खानापूर : १ लाख ७६ हजार २०९ - १ लाख ७१ हजार ५८५ : ३ लाख ४७ हजार ८१३
तासगाव-कवठेमहांकाळ : १ लाख ५८ हजार ५३७ - १ लाख ५२ हजार ७९९ : ३ लाख ११ हजार ३४०
जत : १ लाख ५१ हजार ९१५ - १ लाख ३८ हजार २८१ : २ लाख ९० हजार १९९