श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने आणलेल्या नव्या धोरणानुसार बांधकामाला ६०० रुपये दराने वाळू विक्री करण्याच्या दृष्टीने श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी डेपोची पाहणी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केली आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर हा राज्यातील पहिला वाळू डेपो ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यासह नव्याने रुजू झालेले प्रांतधिकारी किरण सावंत, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघचौरे, मंडलाधिकारी बी.के मंडलिक आदी पाहणी वेळी उपस्थित होते. तालुक्यातील गोदावरी नदीपट्ट्यात मातुलठाण, नायगाव परिसरामध्ये सरकारच्या नवीन धोरणानुसार वाळू डेपोची निर्मित करावयची आहे. यासाठी गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करून त्यांचा सरकारी जागेवर डेपो केला जाणार आहे. तिथपर्यंत जाणारे रस्ते, नदीपात्रात उपलब्ध वाळू तसेच डेपोच्या जागेची यावेळी पाहणी करण्यात आली. या दोन्ही गावांमध्ये नदीपात्रात सध्या पाणी नाही. त्यामुळे डेपो करणे शक्य होणार आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात राज्यातील पहिला वाळू डेपो प्रायोगिक तत्वावर उभारण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. प्रारंभीच्या टप्प्यात डेपोची निश्चिती करण्यात आली आहे. वाळू घाटापासून ते डेपोपर्यंत वाळू वाहतुकीसाठी एक एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे तर वाळू डेपोपासून ग्राहकाच्या बांधकामाच्या जागेपर्यंत पोहोचवण्यासाठी दुसरी एजन्सी नियुक्त केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. ग्राहकांना सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळू कधीपासून मिळेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळू डेपोची निर्मिती हा नव्या धोरणाचा प्रारंभीचा टप्पा मानला जात आहे.