सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनी ६ जून रोजी मारुती चौकातील पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. ही देशातील पहिलीच शिवज्योत असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले की, सांगलीत रायगडावरून शिवज्योत आणण्यात येणार आहे, मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ कायमस्वरूपी ती तेवत ठेवली जाणार आहे. या शिवज्योत स्थापनेसाठी सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्ल्यांवरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे.शहरातील तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व ध्येयवाद कायम तेवत राहावा, यासाठी या ज्योतीची स्थापना करण्यात येत आहे. या उपक्रमाचे संकल्पक वीरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी मांडली. शिवछत्रपतींचे स्मरण व नमन करण्यासाठी ६ जूनला संध्याकाळी सहा वाजता या ज्योत प्रज्वलनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व सर्व शिवप्रेमी यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महापालिका आणि शिवप्रेमींनी या उपक्रमाला संमती दिली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी त्यासाठी बैठक घेतली होती, असेही पाटील म्हणाले.
सांगलीत तेवणार देशातील पहिली अखंड शिवज्योत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 2:07 PM