सांगली : अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी जलसंपदा विभागाने समन्वय ठेवला आहे, मात्र धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात धरणातून विसर्ग केला जात नसल्याचे निरीक्षण महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने नोंदविले आहे. सध्या दोन लाख क्युसेक पाणी सोडले जात असून आणखी किमान ७५ हजार क्युसेक सोडण्याची मागणी केली आहे.अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने समन्वय ठेवला असून स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत धरणातील साठ्यावर लक्ष ठेवले जात आहे. धरणातील आवक आणि विसर्गामध्ये समन्वयासाठी पाठपुरावा केला जात आहे. यादरम्यान, समितीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून, अलमट्टीतून विसर्ग वाढविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती असून कोयना, चांदोली धरणातूनही पाणी सोडले जात आहे. त्याद्वारे अलमट्टीमध्ये किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. राजापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा निचरा गतीने होण्यासाठी अलमट्टीतून किमान २ लाख ७५ हजार क्युसेक गतीने विसर्ग आवश्यक आहे.
कृष्णेची फूग वाढणार अलमट्टीत सध्या १११.६४४ टीएमसी साठा आहे. तो कायम ठेवण्यासाठी विसर्ग दोन लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पण कृष्णेतून धरणात येणारे पाणी पाहता तो वाढविण्याची गरज आहे. कोयनेतील विसर्ग शुक्रवारी सकाळी वाढवला जाणार आहे, त्यामुळे कृष्णेची फूग वाढणार आहे. अलमट्टी धरणातील पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाटबंधारेने निवृत्त अभियंत्याची नियुक्ती केली आहे.