लोकमत न्यूज नेटवर्कगोटखिंडी (जि. सांगली) : ऊसतोड मजुरांनी चक्क कोल्ह्याला झोपडीशेजारी बांधून त्यांच्यासोबत खेळत होते. वन विभागाला माहिती मिळताच धाव घेतली आणि त्याची सुटका केली. वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.
गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ऊसतोडीसाठी मोठ्या संख्येने मजूर आले आहेत. ते परिसरात झोपड्या बांधून राहत आहेत. ऊसतोडीदरम्यान, एका मजुराला फडात कोल्हा आढळला. त्यांनी त्याला पकडून बांधून ठेवले. काही जण त्याच्याशी खेळतही होते. शुक्रवारी एका ग्रामस्थाने याची माहिती प्राणीमित्रांना दिली. त्यानंतर वनरक्षक कोळेकर यांनी कोल्ह्याला ताब्यात घेतले.
सापळ्यात अडकला उसामध्ये काही शेतकरी रानडुकरांना पकडण्यासाठी फासकी लावतात. हा कोल्हा त्या फासकीत अडकला होता. मजुरांना दिसताच त्याला ताब्यात घेऊन वस्तीमध्ये डांबून ठेवले होते.