शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: मिरजेचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकासकामांच्या फायली महासभेत दाखवत अधिकाऱ्यांच्या सह्या कधी होणार, असा सवाल करत प्रशासनाला जाब विचारला. याला आक्षेप घेत त्यांचे विरोधक भाजपचे नगरसेवक विवेक कांबळे यांनी हातातील फायली हिसकावून घेत भरसभेत फाडून टाकल्या. यामुळे गोंधळ निर्माण झाला.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेची सभा झाली. प्रारंभी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकासकामांच्या फायलीवरून प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, महापौरांसह पदाधिकाऱ्यांची कामे मंजूर झाली. मात्र नगरसेवकांचे काय? अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या २० लाखांच्या कामांना मंजुरी मिळालेली नाही. फायलीवर सह्या करण्यासाठी अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करत आहेत. नगरसेवकांना फायली घेऊन हेलपाटे मारावे लागतात.
थोरात यांनी विकासकामांच्या पाच फायली सभागृहात सादर केल्या. यावेळी भाजपचे नगरसेवक विवेक कांबळे यांनी थोरात यांची कृती बेकायदेशीर असल्याचे सांगताच दोघांत जोरदार वादावादी सुरू झाली. दोघेही महापौर आसनासमोरील जागेत जाण्याचा प्रयत्नात होते. तेवढ्यात कांबळे यांनी फायली सभागृहात फाडण्याचा इशारा दिला. यावर थोरात यांनी ‘आताच फाडा’, असे म्हणत फायली त्यांच्याकडे फेकल्या. कांबळे यांनी दोन फायली फाडल्या. त्यामुळे सभागृहात पुन्हा गोंधळ सुरू झाला. कांबळे यांच्यावर महापालिकेच्या फायली फाडल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी थोरात यांनी केली.