मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे कर्ज कमी मंजूर केल्याच्या व मराठीत माहिती देत नसल्याच्या कारणावरून बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यास चार बहिणींनी बँकेतच मारहाण केली. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत चौघींविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघींना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून शाखाधिकारी राघवेंद्र अमरेंद्रकुमार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी चौघींना ताब्यात घेतले आहे. बँक अधिकाऱ्यास मारहाणीचा निषेध म्हणून मालगाव येथील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर काम बंद ठेवले.बँक ऑफ इंडियाच्या मालगाव शाखेत संबंधित चार बहिणींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सुपारी फोडण्याच्या उद्योगासाठी २५ लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. मात्र, त्यांना चार लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी या चारही बहिणींनी बँकेत येऊन कर्जाबाबत विचारणा केली. शाखाधिकारी राघवेंद्र परप्रांतीय असल्याने ते हिंदीत बोलत होते. त्यांनी चार लाख कर्ज मंजूर झाल्याचे सांगितल्याने त्यांच्यात वादावादी झाली. राघवेंद्र यांना चौघी बहिणींनी मराठीत बोला, असे म्हणत मारहाण करून त्यांचा शर्ट फाडला. या प्रकाराचे बँकेतील सीसीटीव्हीत चित्रण झाले आहे.बँकेच्या शाखाधिकाऱ्यास मारहाणीच्या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालगावात धाव घेतली. मारहाणीच्या निषेधार्थ कामकाज बंद ठेवण्यात आले. मिरज ग्रामीण पोलिसांत कर्मचारी आणि विरोधी गटातील महिलांच्या नातेवाइकांनी तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या महिलांविरुद्ध शासकीय कामात अडथळ्याचा व शाखाधिकारी राघवेंद्र यांच्याविरुद्ध अश्लील अपशब्द वापरल्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
कर्ज अन् मराठीत माहिती देत नसल्याचे कारण, बँकेच्या शाखाधिकाऱ्यासच चौघी बहिणींनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 1:59 PM