सांगली : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सोमवारी सांगलीच्यारेल्वे स्थानकाची पाहणी केली. स्थानकावरील कामांसह नव्या एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत असलेल्या सांगलीकरांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, गजानन साळुंखे, माजी नगरसेवक संताेष पाटील यांच्याशी यादव यांनी चर्चा केली. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असूनही सांगली स्थानकावर तसेच जादा उत्पन्न देणाऱ्या किर्लोस्करवाडीला नव्या गाड्यांना थांबा मिळत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. यावर यादव यांनी याबाबत रेल्वे प्रशासन नेहमीच सकारात्मक राहील, असे स्पष्ट केले.सांगलीतील चिंतामणीनगर उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबद्दल साखळकर यांनी तक्रार केली. रेंगाळलेल्या कामाचा विपरित परिणाम जिल्ह्याच्या दळणवळणावर तसेच आर्थिक उलाढालीवर झाल्याचे त्यांनी सांगितले. यादव यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाम अभियंत्यांशी चर्चा केली. हे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी सूचना देऊ, असे यादव म्हणाले.
पादचारी पूल होणारसांगलीच्या रेल्वे स्थानकावर अद्याप प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वर पादचारी पुलाचे काम सुरू नसल्याचे साखळकर यांनी सांगितले. यावर यादव म्हणाले, सांगलीच्या स्थानक सर्व प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल होईल. स्थानकाच्या विकासाची मंजूर कामे वेळेत व गतीने पूर्ण कशी होतील, याबाबत दक्षता घेतली जाईल.
निवेदनात अनेक मागण्यासाखळकर यांनी दिलेल्या निवेदनात, संपर्क क्रांती एक्स्प्रेसला थांबा मिळावा, वंदे भारत गाडी सुरू करावी, सांगली-मेंगलोर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, सांगली-विशाखापट्टनम एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर एक्स्प्रेस या गाड्या सुरू कराव्यात, सांगली स्थानकावर रिटायरिंग रूम, क्लॉक रूम उभी करावी, पाणी भरण्याची व्यवस्था उभी करावी, स्थानकाच्या पूर्व दिशेला प्रवेशद्वार किंवा पूल उभारावा, माधवनगर स्थानकावर गुडस् टर्मिनल करावे आदी मागण्या करण्यात आल्या.