निवडणूक जाहीर झाली आहे. 22 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे. अनेकांनी तिकीट मागितले आहे. तुम्हा सर्वांना वाटते की, मीही येथून निवडणूक लढवावी. तर आता यासंदर्भात पक्ष ठरवेल कुणी लढायचे? कसे लढायचे ते. तर आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने जत तालुका उभा करू या. महायुतीचे सरकार एक लाख टक्के पुन्हा येणार आहे. कारण आता संपूर्ण भिस्त आपल्या लाडक्या बहिणींच्या हातात आहे. तुम्ही जरी फुटलात तरी त्या फुटत नाहीत. कारण मध्यप्रदेशात 27 च्या 27 ही खासदार बहिणींनीच निवडून दिले आहेत, असे भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ते रविवारी सांगली जिल्ह्यात बोलत होते.
पडळकर म्हणाले, "आता सर्वांच्या खात्यावर दीड-दीड हजार रुपये येत आहेत. विरोधक म्हणाले, आम्ही सत्येवर आलो की, सर्वप्रथम लाडकी बहिण योजना बंद करू. काँग्रेसच्या आमदाराने वक्तव्य केले आहे. काही लोकही त्यांनी न्यायालयात पाठवले आहेत. एवढे ते घाबरले आहेत. त्यांना माहीत आहे की, काँग्रेसचा पुढारी तिकडे आणि घरातील भगिणी इकडे, अशी परिस्थिती आहे. हे त्यांना माहीत आहे."
"काही जण बोलले दीड हजारात काय होणार? अरे आम्ही बघितले आहे. आम्ही गावात राहतो. कण-कण जर आली, ताप जर आला, तर 50 रुपये डॉक्टरला द्यावे लागतात म्हणून, आमची बहीण चार दिवस अंथरूनात अंगावर तो आजार काढते. इंजेक्शनला 50 रुपये, गोळ्यांना दोनशे रुपये द्यायला नाहीत म्हणून. त्यामुळे, दीड हजार रुपये आमच्या बहिणींसाठी मोठी रक्कम आहे." असा निशाणाही त्यांनी विरोधकांना लगावला.