अविनाश कोळीसांगली : चारच महिन्यापूर्वी ‘हात से हात जोडो’ अभियानातून गटबाजी संपवून एकसंध होण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला होता अन् बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांची साथ सोडत गटांचा झेंडा फडकविण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षापेक्षा गटांना महत्त्व दिल्याने काँग्रेस जिल्ह्यात तळाला जात आहे, याचे भानही नेत्यांना राहिलेले नाही.सांगलीत नुकतीच काँग्रेसमधील वसंतदादा गटाची बैठक पार पडली. गटावर अन्याय होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. महाविकास आघाडीतील ही कुचंबणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना जाणवली नव्हती, मात्र बाजार समितीतच ती जाणवली. मागील लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविण्याची वेळ वसंतदादा गटावर आली त्यावेळी गटाच्या अस्तित्वाला धक्का पोहाेचला नव्हता, मात्र तीनच तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना या प्रश्नांनी सध्या हैराण केले आहे.पक्षापेक्षा गटांना महत्त्व दिले गेल्याने काँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळला आहे. गटबाजीचा हा विषय केवळ जिल्ह्यापुरता मर्यादीत राहिला नाही. प्रदेशाध्यक्षांना अनेकदा याबाबत कानउघाडणीही करावी लागली आहे. तरीही काँग्रेसमधील गटबाजीचा प्रश्न अद्याप संपलेला नाही.पक्षाचा आदेश म्हणून ‘हात से हात जोडो’ अभियान राबविले गेले. त्यात वसंतदादा गटाचे प्रमुख विशाल पाटील यांनीच गटबाजी संपली पाहिजे, असा मुद्दा मांडला; पण आता तेच स्वतंत्र गट करून पुढे जाऊ पाहात आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्ते गोंधळले आहेत. एका बाजार समितीत ही अवस्था असेल तर विधानसभा व लोकसभेचा शिवधनुष्य येथील काँग्रेस कशी पेलणार, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
वसंतदादा गटाकडे काय नाही?सध्या वसंतदादा गटाचे नेते विशाल पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद आहे. शैलजाभाभी पाटील यांच्याकडे महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद, जयश्रीताई पाटील यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्व, जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद आहे. वसंतदादा कारखान्याची धुरा तसेच जिल्हा बँकेतील संचालकपदही विशाल पाटील यांच्याकडे आहे.
विधानसभा, लोकसभेला काय झाले?
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधीलच एका गटाने घात केल्याचा उल्लेख राज्यातील काही नेत्यांनी सांगलीत येऊन केला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे उसनवारी करावी लागली. पुढील निवडणुकीत मोठी आव्हाने असताना काँग्रेस गटबाजीत रममाण झाल्याचे चित्र आहे.