तासगाव : मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरयाऽ मोरयाऽऽचा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला उधाण आलेले..अशा वातावरणात अथांग जनसागराच्या भक्तिरसात तासगावचा ऐतिहासिक २४५ वा रथोत्सव सोहळा रविवारी पार पडला.तासगाव येथील श्री गणपती पंचायतनच्या रथोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन रथोत्सव सुरू केला. श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, डॉ. अदिती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. दुपारी पटवर्धन राजवाड्यातून छबिना बाहेर पडला. त्यात पटवर्धन यांच्यासह मानकरी सहभागी झाले होते. श्री गणपती मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर रथापर्यंत आणण्यात आली. रथाच्या मध्यभागी उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. रथाचे दोरखंड हातात घेऊन भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. भाविकांनी जोशात रथ ओढत श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर गाठले. रथयात्रेदरम्यान रथाभोवती पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
प्रथेप्रमाणे श्री गणपती मंदिरापुढे असणाऱ्या श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ ओढण्यात येतो. श्रीशंकर व श्रीगणपती या पिता-पुत्रांची भेट झाल्यावर रथ परतीच्या प्रवासाला लागतो. श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ गेल्यानंतर तेथे श्रींची आरती झाली व रथाचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी व रथावर नारळाचे तोरण बांधण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. उशिरा संस्थानच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन केले. विश्वस्त डॉ. अदिती पटवर्धन यांच्यासह मानकऱ्यांनी संयोजन केले.