सांगली : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. दोन वर्षांपूर्वी मृत झालेल्या बांधकाम कामगाराच्या विधवा पत्नीच्या खात्यावर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून दोन लाखांचे अनुदान वर्ग झाले, मात्र अवघ्या अर्ध्या तासातच दलालाच्या खात्यावर निम्मे पैसे निघून गेले. कागदपत्रे व अन्य पुराव्यांसह याबाबतची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्यानंतर मंडळात खळबळ निर्माण झाली आहे.तांबवे (ता. वाळवा) येथील एका नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. एका दलालाने त्याच्या कुटुंबीयांना गाठले. त्यांना पैसे मिळवून देण्याची ग्वाही त्याने दिली. कुटुंबीयांनी दलालावर विश्वास ठेवत सर्व कागदांवर सह्या केल्या. दोन वर्षांनंतर हे अनुदान अखेर मृत बांधकाम कामगाराच्या विधवा पत्नीच्या खात्यावर जमा झाले.दुपारी बाराला दोन लाख रुपये नियमाप्रमाणे जमा झाले, मात्र लगेचच अर्ध्या तासात आरटीजीएसद्वारे त्यातील एक लाख रुपये दलालाच्या खात्यावर वर्ग झाले. संबंधित लाभार्थीच्या खात्यावरील रकमांच्या नोंदी, व अन्य पुरावे गोळा करुन याबाबतची रितसर तक्रार कामगार कार्यालयाकडे करण्यात आली आहे.अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चाअनुदान हडप करणाऱ्यांवर व तांबवेतील प्रकरणावर तातडीने कारवाई न झाल्यास कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल. कामगार आयुक्त कार्यालयालाही टाळे ठोकू, असा इशारा खराडे यांनी दिला आहे.‘सलीम’ कोण आहे?वाळवा तालुक्यातील सलीम नावाच्या एजंटाविषयी तक्रार करण्यात आली आहे. या एजंटाची कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर मैत्री आहे. त्यातूनच त्याने आजवर बांधकाम कामगारांच्या विविध योजनांचा लाभ अनेकांना मिळवून दिला, मात्र तो सामाजिक कार्य म्हणून नव्हे तर उद्योग म्हणून. त्यामुळे यानिमित्ताने त्याचे कारनामे सध्या चर्चेत आले आहेत.१५० कोटींचा भ्रष्टाचारअशाप्रकारच्या अनेक तक्रारी वाळवा तालुक्यातून महामंडळाकडे सतत येत आहेत. त्याची दखल घेतली न गेल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पुराव्यासह महामंडळाकडे तक्रार केली. महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १५० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.कामगारमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील प्रकारकामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच लाभार्थींचा निधी हडप करण्याचे प्रकार खुलेआम सुरू असल्याने स्वाभिमानी संघटनेने आश्चर्य व्यक्त केले. मंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून पुराव्यांच्या आधारे संबंधित दलालावर गुन्हा दाखल करून त्यांना साहाय्य करणाऱ्या मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी खराडे यांनी केली आहे.
नवरा मेला अन् बायकोला अनुदान आले, पण निम्मे दलालानेच गिळले, कामगारमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 6:20 PM