कुरळप: वाळवा परिसरात पाच दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ऐतवडे खुर्द येथील वारणा नदी दुधडी भरून वाहत आहे. आज गुरुवार सकाळी पाणी पुलाच्या खालोखाल आले होते. तर, चिकुर्डे येथील छोटा बंधारा पाण्याखाली गेला आहे. मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या पाच दिवसापासून दमदार सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. जुलै महिना संपत आला तरी पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. मात्र सध्या पावसाची संततधार सुरु आहे. चांदोली पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून आज चांदोली धरणातून चारशे क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. यामुळे ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होवू शकते. सतर्कतेचा इशारा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Sangli: वारणा परिसरात पावसाचा जोर वाढला, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा
By श्रीनिवास नागे | Updated: July 20, 2023 18:04 IST