विकास शहा -शिराळा : सांगली जिल्ह्यात वन्य प्राणी उपचार केंद्राअभावी वेळेत उपचार न झाल्याने अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असल्याची बाब शिराळा विधानसभेचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी नागपूर येथील अधिवेशनात उपस्थित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता कोठेच वन्य प्राणी उपचार केंद्र नसल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व पक्षी आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र शिराळा येथे उभे करावे, अशी लेखी मागणी नाईक यांनी केली आहे.सांगली जिल्ह्यात मागील काही वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र वाढती संख्या व आधुनिकीकरणामुळे वन्य प्राणी व मनुष्य यांचा सतत संपर्क येत आहे. रस्ते, नदीतील अतिक्रमण, वृक्ष तोड, बांधकामे, शेतीमधील पारंपरिक बदल यामुळे वन्यप्राणी जखमी होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशा जखमी वन्य प्राण्यांवर ताबोडतोब उपचार करून निसर्गात सोडणे गरजेचे असते. वन्यप्राण्यांची सुटका केल्यानंतर ते काही काळ तणावाखाली असतात. म्हणून त्यांना थोडावेळ ठेवून रात्री निसर्गात सोडले जाते. या सर्व जबाबदारी पार पाडत असताना वन विभागाला एक स्वतंत्र यंत्रणेची गरज आहे.शिराळा येथे वन विभागाच्या खर्चातून एक अत्याधुनिक वन्यप्राणी उपचार केंद्र उभारल्यास बऱ्याच वन्यप्राण्यांना वेळेत उपचार मिळून त्यांचे जीव वाचतील, असे मत नाईक यांनी मांडले.
जिल्ह्यातील वन्य प्राणी उपचार केंद्राचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित, शिराळ्यात उपचार केंद्र उभारण्याची मागणी
By अविनाश कोळी | Published: December 10, 2023 7:15 PM