दरिबडची : जत पूर्व भागात मंगळवारी (दि. १८) सकाळी आठ वाजता उटगी,बालगाव, बोर्गी खुर्द, बोर्गी बुद्रुक, उमदी या परिसरात पुन्हा एकदा मोठा गूढ आवाज आला. गेल्या आठवड्यात भूगर्भातून असाच मोठा आवाज आला होता. आज पुन्हा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आवाज कशाचा आला, याची चर्चा नागरिकांतून झाली. यावेळी नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची चर्चाही होती.आज सकाळी दरम्यान उमदी उटगी, बालगाव परिसरात गूढ व मोठा आवाज आला. याबाबत स्थानिक चौकशी व माहिती प्राप्त होताच अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी जिल्हा आपत्ती विभागाशी संपर्क करून गूढ आवाजाची माहिती दिली.आवाजाचे गूढ उकलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक तज्ज्ञ भूवैज्ञानिक पथक उटगी, उमदी संख या भागात दाखल झाले. त्यानंतर आवाजाची माहिती आणि अभ्यास करण्याकरिता वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा सांगलीचे अमित जिरंगे, अप्पर तहसीलदार संखचे सुधाकर मागाडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पूर्वभागातील उटगी, उमदी बोर्गी, बालगाव गावाना भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.पथकाकडून गूढ आवाजाची माहिती घेऊन तपास करण्यात येणार आहे. अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी दिली. यावेळी उटगी उमदी गावातील सरपंच, तलाठी पोलीस पाटील, नागरिक आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्यांदा आवाज जत पूर्वभागात सोमवारी दि.१० जूनला सकाळी साडेनऊच्या सुमारास गूढ आवाज आला. २९ मे रोजी जत सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील शिस्सी, गोणेवाडी, लेंडवे चिंचाळे, नंदेश्वर, भोसे येथे सुद्धा गूढ आवाज आला. आता दुसऱ्यांदा हा आवाज आला आहे.