सांगलीतील उमेदवारीचा चेंडू काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात, जिल्ह्यातील नेत्यांना समझोता घडविण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 18:00 IST2024-10-19T18:00:23+5:302024-10-19T18:00:54+5:30
जयश्रीताई पाटील निवडणूक लढण्यावर ठाम

सांगलीतील उमेदवारीचा चेंडू काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात, जिल्ह्यातील नेत्यांना समझोता घडविण्यात अपयश
सांगली : सांगलीविधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. या दोघांमध्ये समझोता घडविण्याची जबाबदारी आमदार डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांच्यावर होती. पण गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे सांगलीतील पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकला आहे.
सांगली विधानसभेची निवडणूक लढविण्यावरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत खासदार विशाल पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर बैठक झाली; पण बैठकीमधून कोणताही तोडगा निघाला नाही. पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील समर्थक निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.
कदम व पाटील यांनी चार तास चर्चा करूनही निर्णय झाला नाही. पक्षश्रेष्ठींकडे शुक्रवारी नावे पाठवायची होती; पण इच्छुकांमध्ये तोडगा न निघाल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात सांगली मतदारसंघाचा चेंडू टाकला आहे. दोन दिवसांत मुंबई काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.
मी निवडणूक लढणारच : जयश्रीताई पाटील
मी पक्षाकडे सांगली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे कार्यकर्ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी दिली.
विधान परिषदेसह सर्व प्रस्ताव फेटाळले..
जयश्रीताई पाटील यांच्यासाठी विधान परिषदेचा प्रस्ताव बैठकीत दिला होता. तसेच महापालिका क्षेत्रातील राजकीय नेतृत्वाची जबाबदारी व जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपदाची ऑफर दिली होती; पण हे सर्व प्रस्ताव जयश्रीताई आणि त्यांच्या समर्थकांनी नाकारले आहेत. त्या विधानसभा लढण्यावर ठाम असून, या अगोदर त्यांनी बंडखोरीचाही इशारा दिला आहे.
एकाने लढावे, एकाने विधानपरिषद घ्यावी : विश्वजीत कदम
सांगली विधानसभा निवडणुकीत एकाने लढावे आणि एकाला आगामी विधानपरिषद निवडणुकीत संधी दिली जावी, असा तोडगा डॉ. विश्वजीत कदम यांनी काढला. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खासदार राहुल गांधी यांनी देखील सांगलीसाठी एक विधानपरिषद देण्याचे मान्य केले आहे, असे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे नुकसान होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.