विटा : खानापूर घाटमाथ्यावरील अग्रणी नदीचे पुनरूज्जीवन कामासाठी २०१३ साली पहाणी केली. त्यावेळी अग्रणीच्या उगमावर काम होणे गरजेचे असल्याचा सांगण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी अपेक्षित काम झाले नाही. आज अग्रणी नदी वाहती झाली असली, तरी तिचा उगम मात्र कोरडाच असल्याची खंत जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली.खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीच्या उगमाची पाहणी डॉ. राणा यांनी बुधवारी केली. उगमाच्या ठिकाणी खासगी शेतजमीन मिळाल्यास तेथे छोटासा तलाव उभारून पाणीसाठा करण्याची गरज व्यक्त केली. तसे झाल्यास अग्रणी नदीचा कोरडा असणारा माथा पुनरूज्जीवित होऊन प्रवाहित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी करंजे (ता. खानापूर) येथील गोपीनाथ सूर्यवंशी म्हणाले, अग्रणीचा उगम व टेंभू योजनेपासून वंचित गावे यांच्यासाठी जलबिरादरीने भूमिका घ्यावी.यावेळी अगस्तीनगर (ऐनवाडी) चे सरपंच दाजी पवार यांनी खासगी जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. डॉ. राणा यांनी करंजे येथील नवीन बंधारा व वाघदरा तलावाची पहाणी केली. त्यांच्यासोबत जलबिरादरीचे राज्य समन्वयक नरेंद्र चुघ, जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर, जालिंदर पवार, गोपीनाथ सूर्यवंशी, श्रीकांत इंगळहळ्ळीकर, वर्धा येथील निवृत्त कार्यकारी अभियंता सुनील राहणे, संदीप बाबर, जगन्नाथ सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, सागर मेटकरी, दिलीप माने, महादेव माने आदी उपस्थित होते.
अग्रणी नदी वाहती झाली, उगम मात्र कोरडाच; राजेंद्रसिंह राणा यांची खंत
By संतोष भिसे | Published: April 04, 2024 4:09 PM