अविनाश कोळीसांगली : मुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्गावर गाड्या तोट्यात धावतात, हे दाखवण्यासाठी नऊ तासांच्या प्रवासाची गाडी चक्क १७ तासांत सांगलीत पोहोचवली जातेय. आधुनिक गाड्यांपेक्षा नॅरोगेजवरील रेल्वे बऱ्या, अशा शब्दांत प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे हे कारस्थान असल्याची शंका प्रवासी संघटनांनी उपस्थित केली आहे.
मध्य रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे सांगलीमार्गे धावणाऱ्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाड्या मुंबई-सांगली प्रवासासाठी नऊ तासांऐवजी १७ तास घेत आहेत. सुरुवातीला नव्वद टक्के बुकिंग असलेल्या या गाड्यांचे बुकिंग भविष्यात कमी होईल. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान होते. नेमकी हीच बाब सांगली, कोल्हापूरसाठी धोक्याची आहे. बुकिंग व तोट्याचे आकडे पुढे करीत या मार्गावरील नव्या गाड्यांना मंजुरी नाकारली जाण्याची भीती आहे.
या गाड्या धावल्या उशिरा१२ ऑगस्ट : गाडी (क्र. ०१०९९) तब्बल सहा तास उशिरा सांगलीत पोहोचली. या गाडीत ९० टक्के बुकिंग होते. तरीही गाडीने दुप्पट वेळ घेतला.१३ ऑगस्ट : सांगली स्टेशन पोहोचण्याची वेळ सकाळी ९:४० वाजताची होती; पण ही गाडी दुपारी २ वाजता सांगलीत पोहोचली.
प्रवासी म्हणतात..बैलगाडी बरीपुढीलवेळी एक्स्प्रेस गाड्यांचा असा बैलगाडीच्या वेगाने प्रवास करणार नसल्याचा पवित्रा सांगली, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी व कोल्हापूरच्या लोकांनी घेतला आहे. वाईट अनुभवामुळे २३ सप्टेंबर रोजी सोडलेल्या मुंबई-कोल्हापूर विशेष गाडीला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. यातील सुमारे ९५५ सीट्स रिकाम्या राहिल्या.
सकाळची गाडी आली सायंकाळीमध्य रेल्वेने ऑगस्टमधील अनुभव घेऊनही तोच कित्ता गिरवित २३ सप्टेंबरच्या विशेष गाडीला ८ तास उशीर केला. ही गाडी मुंबईहून सांगलीत सकाळी ९:४० वाजता पोहोचणार होती; पण ती सायंकाळी साडेपाच वाजता आली, असे रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी सांगितले.
विजेवरील गाड्या, कोळशाला लाजविताहेतमुंबई-सांगली-कोल्हापूर रेल्वे मार्ग शंभर टक्के विद्युत इंजिनवर चालतो व हा मार्ग इतर मार्गांपेक्षा मोकळा असतो. तरीही कोळशावरील गाड्या लाजतील, अशा मंदगतीने या मार्गावर गाड्या धावताहेत, असे मत रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली व मुंबई मार्गावर नव्या गाड्या मंजूर व्हाव्यात, येथील प्रवाशांचा प्रवास सोयीचा व जलदगतीने व्हावा, यासाठी अनेक वर्षे प्रवासी व संघटनांची धडपड सुरू आहे. तरीही मध्य रेल्वे प्रशासनाचा हा अडथळा आणण्याचा कारभार अयोग्य आहे. -कौशिक मालू, रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप, सांगली