सांगली : शहरातील अनेक भागात होत असलेल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी तातडीची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणीपुरवठ्याबद्दल येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्तांनी विचारणा केली. पाणीपुरवठा विभागाने शुद्ध पाणी देण्याबाबत केलेल्या उपाययोजनेबाबत अभियंता अजहरअहमद मुल्ला, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी माहिती दिली.कृष्णा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पाणी अशुद्ध होत आहे, असा खुलासा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. सध्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर होत असलेले पाणी शुद्धीकरण चांगल्या पद्धतीने होत असून पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास नाही. नदीपासून येत असलेल्या पाण्यामध्ये काही प्रमाणत अशुद्ध घटक मिळून आल्याचे सांगितले. उपायुक्त वैभव साबळे यांनीही पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. बोगस कनेक्शनधारकांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
तज्ज्ञांची मदत घ्याअशुद्ध पाण्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन पूर्तता करावी, अशी सूचना आयुक्त पवार यांनी दिली. याकामी कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.